जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे वक्तव्य
३५ हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ
सिंधुदुर्ग | राजन चव्हाण
पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सन २०२५-२६ च्या आंबा व काजू फळपीक विमा योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ३५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ८६ कोटी रुपयांची विमा भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांनी राज्य व केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानत असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.
दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मिळणारी विमा भरपाई यंदा जुलै महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असून, हे पालकमंत्री नितेश राणे यांच्या नियोजनाचे फलित असल्याचे सावंत यांनी नमूद केले. मे महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जुलैअखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना विमा रक्कम वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली, असे त्यांनी सांगितले.
यंदा अनेक मंडळांमध्ये पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ ते ९५ हजार रुपयांपर्यंत विमा भरपाई मिळत असून, आंबा-काजू बागायतदारांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. काही मंडळांतील काजू उत्पादक शेतकरी अद्याप विम्यापासून वंचित असून, त्याबाबतही पालकमंत्री राणे यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी ३१ जुलैपूर्वी ई-पीक पाहणी पूर्ण करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. ई-पीक पाहणी केल्यास पीक विम्यासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या पुढाकाराने नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या ७,३१० शेतकऱ्यांच्या खात्यात २ टक्के व्याज रिबेटपोटी एकूण १ कोटी ९० लाख रुपये जमा करण्यात आल्याची माहितीही प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *