मुंबई : दहिसर येथील पूर्णप्रज्ञा हायस्कूल च्या गुंजारव नेचर क्लब तर्फे आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने ‘वृक्ष लावा, निसर्ग वाचवा’ हे सूत्र अंमलात आणण्यासाठी वृक्षदिंडी आणि वारकरी दिंडी काढण्यात येऊन अभिनव पद्धतीने आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. पूर्णप्रज्ञा हायस्कूल चे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत या वारकरी आणि वृक्षदिंडी मध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे हा संपूर्ण परिसर अतीशय नैसर्गिक आणि भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. बाल गोपाळ आणि गोपिकांच्या या पारंपारिक पद्धतीने निघालेल्या तसेच विठ्ठल रखुमाई साकारलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या मुळे ही दिंडी लोकांना थेट पंढरीच्या वातावरणात नेत असल्याचा आभास निर्माण झाला. या दिंडीमुळे नागरिकांना वृक्ष लागवड करा, वृक्ष वाचवा, निसर्ग वाचवा’ यासाठी निश्चितच प्रेरणा मिळू शकेल असा विश्वास आयोजकांतर्फे व्यक्त करण्यात आला.
