प्रशासन निष्पाप नागरिकाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का?
संतप्त नागरिकांचा सवाल
कल्याण : कल्याण पश्चिमेतील गांधारी गावाजवळील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक आणि नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस या खड्ड्यांची संख्या आणि खोली वाढत असून दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक तसेच पादचारी यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. अनेक वेळा किरकोळ अपघात झाल्याची चर्चा असूनही संबंधित प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.
स्थानिक नागरिकांनी तातडीने पुलावरील खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पुलावरील सर्व खड्डे तातडीने बुजवावेत. रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी. अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
00000
