यवतमाळमध्ये ‘बीएलओ’ चा मृत्यू!
यमदूताचा सरकार …
‘ पीएचडी स्कॉलर ‘ विधवेचे शोक संतप्त उदगा
∆ दिवाकर शेजवळ
मुंबई ( २७ जुलै २०२६) – मतदार याद्यांच्या सखोल तपासणीच्या अती ताणामुळे शुगर प्रमाणाबाहेर वाढल्याने डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलेल्या यवतमाळ येथील एका बूथ लेव्हल ऑफिसर ( बीएलओ) चा शनिवारी हृदय विकाराच्या लागोपाठ आलेल्या दोन धक्क्यांनी मृत्यू ओढवला आहे. त्या बी एल ओ चे नाव सिद्धार्थ धनपाल धम्मप्रिय ( ५० वर्षे) असे असून ते ग्रामविकास खात्यात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते.
मधुमेही असलेले सिद्धार्थ धम्मप्रिय यांची शुगर कामाचा अती ताण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाढत्या दबावामुळे ४२० च्या पार गेली होती. तसेच त्यांचा रक्तदाबही कमालीचा खालावला होता. त्यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना सक्त विश्रांतीचा सल्ला दिला होता.
त्याचवेळी सोपवलेले मतदार याद्यांच्या सखोल तपासणीचे ९० टक्के काम पूर्ण झालेच पाहिजे, असे तालका उप शिक्षण अधिकारी एस. ए . काटकर यांनी त्यांना शनिवारी बजावले होते. तसेच सोमवारी जिल्हाधिकाऱ्यासमोर हजर व्हावे, असे आदेश दिले होते. मात्र शनिवारीच संध्याकाळी ७.३० वाजेनंतर सिद्धार्थ धम्मप्रिय यांना हृदय विकाराचे दोन तीव्र धक्के लागोपाठ बसले. त्यात त्यांचा बळी गेला, असे त्यांच्या पत्नी पल्लवी धम्मप्रिय यांनी यवतमाळ येथून फोनवरून बोलताना सांगितले.
प्रमाणाबाहेर वाढणारी शुगर आणि खालावणारा रक्तदाब यामुळे माझ्या पतीला मतदार याद्यांच्या सखोल तपासणीचे काम करणे मुश्किल बनले होते. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांना विश्रांती मिळण्यासाठी त्यांचे काम दोन आठवडे पायपीट करून मी स्वतः पार पाडले, अशी धक्कादायक माहिती त्यांनी यावेळी दिली.
परराज्यांत स्थलांतरित मतदारांना ‘ बीएलओ ‘ नी गाठायचे कसे ?
माझे पती सिद्धार्थ धम्मप्रिय यांच्याकडे  कोळशाच्या दोन खाणी असलेले वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड या कंपनीचे वणी तालुक्यातील राजूर कॉलरी हे क्षेत्र मतदारांच्या तपासणी साठी देण्यात आले होते. तिथले बहुतांश खाण कामगार हे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छतिसगड या राज्यांतील आहेत. ते आपापल्या राज्यांत काही काळासाठी निघून जात असतात, असे सांगतानाच स्थलांतरित मतदारांना बी.एल. ओ . यांनी गाठायचे कसे, असा सवाल पल्लवी धम्मप्रिय यांनी विचारला आहे.
माझ्यावर वैधव्य लादले !
वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड कंपनीच्या क्षेत्रातील ७२१ मतदारांपैकी ४५० पर्यंत मतदार हे परराज्यांतील आहेत, असे सांगून पल्लवी धम्मप्रिय म्हणाल्या की, त्यातील ३०० मतदारांना  शोधून काढण्यात माझे पती आणि मला यश आले. त्यातून मतदार तपासणीचे काम ५५ टक्क्यापर्यंत जावू शकले आहे. पण मतदारांची अनुपलब्धता लक्षात न घेता ९० टक्के काम पूर्ण करण्यासाठी लकडा लावून शिक्षण अधिकाऱ्याने माझ्या मधुमेही पतीवर प्रचंड दबाव आणला होता. अखेर त्यात त्यांचा बळी जावून माझ्यावर वैधव्य लादण्यात आले.
राज्यातील आतापर्यंतचे मृत्यू
यवतमाळ येथील बी. एल.ओ. सिद्धार्थ धनपाल धम्मप्रिय यांच्या अकाली मृत्यूमुळे  मतदार याद्यांच्या सखोल तपासणीच्या कामात अती ताणामुळे महाराष्ट्रात बळी गेलेल्यांची संख्या आता ५ झाली आहे.
१) १३ एप्रिल २०२६ : पुण्यात बी. एल.ओ. प्रा. ज्ञानेश्वर रोटे ( ४० ) यांचा  मोटार सायकल वरून जाताना ऑन ड्युटी अपघाती मृत्यू
२) २८ जून २०२६ : अहिल्यानगर, पाथर्डी येथे बी. एल. ओ. सुनिता पोपळघट या शिक्षिकेचा हृदय विकाराने मृत्यू
३) २३ जुलै २०२६ : पनवेल येथे बी. एल. ओ. कैलास भोयर या चेंबूरच्या महापालिका शाळेतील शिक्षकाचा हृदय विकाराने मृत्यू
४) बी.एल.ओ. शिक्षक स्वामी परभणी.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
कोट
लोकशाहीत लोकांनी, लोकांसाठी, लोकांचे निवडून दिलेले सरकार हे जनतेच्या रक्षणासाठी, कल्याणासाठी असले पाहिजे अशीच अपेक्षा असते. पण नोटबंदीत लोकांचे बळी,कोरोनाच्या लॉक डाऊन मध्ये लोकांचे बळी आणि आता मतदार याद्यांच्या तपासणीत सुद्धा बी. एल. ओ. चे बळी जात आहे. हे सरकार यमदुताचे सरकार आहे काय?
∆पल्लवी धम्मप्रिय
पीएचडी स्कॉलर
मयत बी.एल.ओ. सिद्धार्थ धम्मप्रिय यांची पत्नी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *