१०० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ
कल्याण : वारी पंढरीची सेवा आरोग्याची या ब्रीदवाक्याने सलग चार वर्षे लोणंद (सातारा) येथील पालखी सोहळ्यात हजारो वारकऱ्यांची निःस्वार्थ आरोग्यसेवा केल्यानंतर, तीच सेवेची भावना जपण्यासाठी विटावा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मोफत वैद्यकीय व नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्ताचे औचित्य साधून आयोजित या शिबिरात १०० हून अधिक नागरिकांनी आपल्या आरोग्य व डोळ्यांची मोफत तपासणी करून घेतली. विशेष म्हणजे, शिबिरात आलेल्या पहिल्या ५० रुग्णांना अधिक चार दिवसांचे मोफत उपचार देण्यात येणार आहे. २००४ पासून समाजहिताचे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने विविध ठिकाणी संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल बोलताना आसारा फाउंडेशन चे विश्वस्त पद्मश्री उदय देशपांडे यांनी सांगितले की, “सेवेतच विठ्ठल आहे आणि प्रत्येक निरोगी हास्यातच पांडुरंगाचे दर्शन घडते, या श्रद्धेने आम्ही हे कार्य पुढे नेले आहे. नागरिकांचा मिळालेला हा भरभरून प्रतिसाद आम्हाला भविष्यातही असे उपक्रम राबवण्यासाठी ऊर्जा देणारा आहे.”
