जिल्हाधिकाऱ्यांकडून यंत्रणांना हाय अलर्ट
हरिभाऊ लाखे
नाशिक –भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी, ३१ जुलै रोजी जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी, नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून आवश्यक ती पूर्वतयारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने व कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांच्यासमवेत बैठक घेतली. धरण व्यवस्थापनाबाबत विशेष सूचना देताना मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसाचे पाणी सामावून घेता यावे आणि विसर्ग करताना अकस्मात पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. नदी-नाल्यांवरील कमी उंचीच्या पुलांवर पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित विभागांनी चोवीस तास सतर्क राहावे. आवश्यकतेनुसार वाहतूक नियंत्रणाच्या उपाययोजना तात्काळ राबवाव्यात, जेणेकरून
स्थानिक स्वराज्य संस्थांनी पावसाळी नाले, सांडपाणी वाहिन्यांमधील प्लास्टिक व इतर अडथळे हटवून पाण्याचा निचरा सुरळीत राहील, याची दक्षता घ्यावी. प्रत्येक तालुक्यात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक सामग्री, वाहने, मनुष्यबळ आणि बचाव पथके चोवीस तास सज्ज ठेवावीत. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून जलद प्रतिसाद देण्याची तयारी ठेवावी, असे निर्देशही देण्यात आले. आरोग्य विभागाला ४ ऑगस्टपूर्वी प्रसूती अपेक्षित असलेल्या गरोदर महिलांची माहिती संकलित करून त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून पूर्वनियोजनाद्वारे जवळच्या शासकीय अथवा मान्यताप्राप्त रुग्णालयात दाखल करण्याची कार्यवाही करण्यास सांगण्यात आले. मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींतील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे. दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील ठिकाणांची पाहणी करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
सध्या घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे कारण नाही. मात्र, अलीकडे जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *