गुरुपौर्णिमेनिमित्त स्वाक्षरीचे प्रशिक्षण प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना रुपये एक हजार प्रोत्साहन भत्ता
कल्याण: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत साक्षरतेचा प्रकाश पोहोचविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. समाजातील अंगठा लावणाऱ्या निरक्षर महिला व पुरुषांना स्वाक्षरीचे प्रशिक्षण देऊन ‘अंगठामुक्त समाज’ घडविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या उपक्रमात सहभागी झालेल्या लाभार्थ्यांना स्वाक्षरी करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गुरु मानून साक्षरतेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष राम बनसोडे, जिल्हा सरचिटणीस गजेंद्र राऊत, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत पोळ, मनोज वाघमारे, धुराजी इंगळे, सोमनाथ राऊत, भिकाजी कांबळे, संदीप वाळंज, अंकुश राऊत, राजकुमार राऊत, बाळासाहेब वाघमारे, दिलीप वाघमारे यांच्यासह प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या अस्मिता गायकवाड, कविता रुपवते, तसेच कलावती शेवाळे, मंगल बनसोडे, मंदाबाई बनसोडे, अंजना बनसोडे, मुक्ताबाई गायकवाड आणि अनेक लाभार्थी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रशिक्षणात यशस्वीरीत्या स्वाक्षरीचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मातोश्री गुंजाई फाउंडेशन, महेश गायकवाड आणि शिवसेना चर्मकार संघटना यांच्या माध्यमातून प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात येणार असून, प्रत्येक लाभार्थ्यास रुपये एक हजार प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती आयोजक  राम बनसोडे यांनी दिली. सामाजिक सक्षमीकरण आणि साक्षरतेच्या दिशेने उचललेले हे पाऊल समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणारे ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *