पुढील महापालिका निवडणुकीत १२ वरून ५० नगरसेवक निवडून आणू: मनोज प्रधान
ठाणे : अनिल ठाणेकर
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या पुढाकाराने जयभगवान हॉल येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र व राज्यातील राजकारणासह नव्या पिढीच्या भूमिकेवर भाष्य केले. “जंतर-मंतर आंदोलनातून ‘जेन झी’ पिढीने एका पक्षाची आणि एका माणसाची दहशत संपविली. हास्य-विनोदाच्या माध्यमातून आंदोलन यशस्वी करण्याचे नवे तत्त्वज्ञान या पिढीने देशाला शिकवले,” असे ते म्हणाले.
२०१४ नंतर तपास यंत्रणांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नव्या पिढीने भीती झुगारून संघर्षाचा मार्ग स्वीकारला. सोशल मीडियाच्या प्रभावी वापरामुळे राजकारणाची दिशा बदलत असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या संदेशाचे महत्त्व आज अधिक अधोरेखित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. आव्हाड यांनी मनोज प्रधान यांच्या संघटन कौशल्याचे कौतुक करत, “कार्यकर्ते जोडण्याचे विलक्षण कौशल्य त्यांच्याकडे असून ते पक्षाचे लोहचुंबक आहेत,” असे गौरवोद्गार काढले.
जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कार्यकर्त्यांना संघटन वाढविण्याचे आवाहन करत, “प्रत्येक कार्यकर्त्याने नवीन कार्यकर्ते जोडले पाहिजेत. पुढील ठाणे महापालिका निवडणुकीत पक्षाचे १२ वरून ५० नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य आहे,” असा विश्वास व्यक्त केला. तसेच डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जनतेच्या समस्यांचा वाली – कार्यकर्ता तुमच्या दारी’ आणि ‘लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा वाली – तुमचा भाऊ तुमच्या दारी’ हे अभियान सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मेळाव्याला ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण, गटनेते अभिजीत पवार, महिला अध्यक्षा मनीषा भगत, नताशा आव्हाड, बुद्धभूषण गोटे, राजा राजापूरकर, प्रकाश पाटील, शमीम खान, यासिन कुरेशी, दिपाली भगत, मर्जिया पठाण, पल्लवी जगताप, अक्षय ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *