कल्याण  : ‘नशामुक्त भारत – विकसित भारत’ या राष्ट्रीय संकल्पाला युवकांची ताकद जोडत ठाणे जिल्हास्तरीय ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान’ रविवारी एस.एस.टी. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे उत्साहात पार पडले. ठाणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील ४०० हून अधिक राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी आणि विभागीय समन्वयकांनी या उपक्रमात सहभाग घेत व्यसनमुक्त समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन माध्यमातून देशभरातील एक करोड पेक्षा अधिक युवकांशी संवाद साधत व्यसनमुक्त भारतासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन केले. यावेळी एसएसटी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दीपक गवादे यांनी उपस्थितांना नशामुक्तीची सामूहिक शपथ दिली.
या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे नेतृत्व उपप्राचार्य तथा ठाणे जिल्हा एनएसएस समन्वयक प्रा. जीवन विचारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. मयूर माथूर, प्रा. नम्रता सिंह, प्रा. सुरभी त्रिवेदी तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील एनएसएस कार्यक्रम अधिकारी व विभागीय समन्वयकांनी परिश्रम घेतले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालय प्रशासन समन्वयक प्रा देविदास जळकोटे आणि विभागीय समन्वयक प्रा.विठ्ठल दिवेकर उपस्थित होते. महाविद्यालय व्यवस्थापनाचेही या उपक्रमाला भक्कम पाठबळ लाभले.
अभियानात ‘१०० रविवार – नशामुक्त भारत’ या संकल्पनेअंतर्गत जनजागृती मोहीम, विविध स्पर्धा, शपथ अभियान आणि समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील नशामुक्त भारत अभियानाचे केंद्र बनलेल्या एसएसटी महाविद्यालयाने युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय उत्तरदायित्वाची नवी प्रेरणा निर्माण केली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *