नवी मुंबई : प्रतिनिधी
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाला ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्यानंतर नवी मुंबईतील १५० ऐरोली व १५१ बेलापूर मतदारसंघांमध्ये १ ते ३ ऑगस्टदरम्यान १७३ विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि संबंधित अधिकाऱ्यांसह एसआयआर कामाचा आढावा घेतला. उर्वरित कामासाठी बीएलओ निहाय नियोजन, गणनापत्रांचे डिजिटलायझेशन तसेच अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार मतदारांची काटेकोर पडताळणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ८ ऑगस्टपर्यंत एसआयआर कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आदेश दिले. लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष आणि समाजघटकांच्या सहकार्याने अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचून उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले. कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी दिला.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *