संतोष पडवळ
ठाणे, : मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकाला एक अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. दिवा स्थानकातून दररोज अडीच लाखापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. मागील दहा वर्षात दिवा स्थानकाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले असल्यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे मत दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲड आदेश भगत यांनी व्यक्त केले आहे.
दिवा रेल्वे स्थानकातून कोकण, वसई, मुंबई, कर्जत, कसारा, पनवेल, रोहा या मार्गावर गाड्या धावत असतात. असे असताना देखील साधारण दहा वर्षांपूर्वी दिवा स्थानक हे उपेक्षित स्थानकांमध्ये गणलं जात होतं. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या लोकसभा क्षेत्रात असणाऱ्या कळवा ते अंबरनाथ पर्यंत सर्वच रेल्वे स्थानकांमध्ये केंद्र सरकार व रेल्वे प्रशासन यांच्याशी समन्वय साधून मोठ्या प्रमाणात विकास कामं केली आहेत. तसेच अनेक वर्ष प्रलंबित असलेले विषय मार्गी लावलेले आहेत. पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडणारा एकमेव पादचारी पूल असलेल्या दिवा स्थानकात आज तीन पादचारी पूल झालेले आहेत, जलद लोकल थांबा, जलद लोकलची संख्या वाढली, पूर्वेला नवीन तिकीट घर, नवीन फलाट, सरकते जिने, आसन व्यवस्था, पुरेशी लाईट व्यवस्था, पाणपोई व कोकणात जाणाऱ्या गाड्यांना थांबा अशा अनेक गोष्टी आज दिवा रेल्वे स्थानकात उपलब्ध झाल्या आहेत. येणाऱ्या काळात गर्दीच्या वेळेस दिवा स्थानकातून दिवा-सीएसटी लोकल सेवा सुरू व्हावी व दिवा स्थानकातून कोकणात जाण्यासाठी अधिक नवीन गाड्या सोडण्यात याव्या व कोकणात जाणाऱ्या सर्वच गाड्यांना दिवा स्थानकात थांबा मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिवेकर रेल्वे प्रवाशांना दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत डॉ.श्रीकांत शिंदे हे मोठ्या विक्रमी मताने जिंकून येतील असा आत्मविश्वास दिवेकर रेल्वे प्रवाशांना असल्याचे अँड आदेश भगत यांनी संगितले.