शिवसेनेचे केडीएमसीला निवेदन
कल्याण : श्रावण महिन्यात निघणारी कावड यात्रा सुरक्षित व सुव्यवस्थित पार पडावी यासाठी शिवसेना उत्तर भारतीय विभागाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडे विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात शिवसेना कल्याण शहर (उत्तर भारतीय विभाग) प्रमुख सी. पी. मिश्रा यांनी महापौर ॲड. हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांना निवेदन सादर केले. यावेळी शिवसेना कल्याण शहर प्रमुख निलेश शिंदे तसेच पदाधिकारी प्रशांत तिवारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी डोंबिवलीतील पिंपळेश्वर महादेव मंदिरातून हजारो शिवभक्त अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरात जलाभिषेकासाठी कावड यात्रा काढतात. या यात्रेत युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
सी. पी. मिश्रा यांनी यात्रा मार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजविणे, संपूर्ण मार्गाची स्वच्छता करणे, विविध ठिकाणी मोबाईल शौचालयांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, कचरा व्यवस्थापन तसेच अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. बहुतांश कावड यात्रेकरू अनवाणी चालत असल्याने मार्ग स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
श्रद्धाळूंच्या भावनांचा सन्मान राखत महानगरपालिकेने या मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, जेणेकरून कावड यात्रा शांततापूर्ण, सुरक्षित आणि सुव्यवस्थित वातावरणात पार पडेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
