श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे पोलिसांची तत्पर कारवाई
योगेश चांदेकर
पालघर: जव्हार तालुक्यातील धारणहट्टी गावातील दोन आदिवासी अल्पवयीन मुलांना बालकामगार म्हणून वाडा तालुक्यातील कोने गावातील एका पोल्ट्रीवर नेल्याची घटना समोर आली. श्रमजीवी संघटनेच्या तातडीच्या पाठपुराव्यामुळे आणि पोलिसांच्या जलद कारवाईमुळे दोन्ही मुलांचा काही तासांत शोध लागला असून त्यांना सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे.
धारणहट्टी येथील राजा जाधव (वय १४) आणि रोहिदास सवरा (वय १२) हे दोघे अल्पवयीन मुलगे त्यांच्या आई-वडिलांच्या अनुपस्थितीत एका इसमाकडून वाडा तालुक्यातील कोने गावातील एका पोल्ट्रीवर कामासाठी नेण्यात आले. मुलांचे आई-वडील शेतीच्या कामानिमित्त बाहेर गेले होते. घरी परतल्यानंतर मुलं बेपत्ता असल्याचे लक्षात येताच त्यांनी जव्हार येथे सुरू असलेल्या बालसंजीवन छावणीत श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष सीता घाटाळ यांची भेट घेतली.
सीता घाटाळ यांनी तातडीने श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड तसेच जव्हार तालुका अध्यक्ष अजित गायकवाड यांना माहिती देऊन मुलांचा शोध सुरू केला. त्याचबरोबर जव्हारचे पोलीस निरीक्षक किरण पवार, समीर महेर, पोलीस उपअधीक्षक, जव्हार, तसेच राजेंद्र कदम, पोलीस निरीक्षक, वाडा यांना माहिती देण्यात आली.
राजेंद्र कदम यांनी चेतन सोनावणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपविली. दिवसभर वाडा तालुक्यातील विविध पोल्ट्री फार्मवर शोधमोहीम राबविल्यानंतर कोने गावातील एका पोल्ट्रीवर दोन्ही मुले आढळून आली. पोलिसांनी मुलांना सुरक्षित ताब्यात घेतले असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणात पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित, श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष सीता घाटाळ, सरचिटणीस विजय जाधव आणि पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांनी पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांचे तसेच या कारवाईत सहभागी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *