जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
अशोक गायकवाड
ठाणे : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कमाल रु.२.०० लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांना या योजनेचा तात्काळ लाभ मिळावा यासाठी आधार प्रमाणीकरणाची (आधार ई-केवायसी ) प्रक्रिया सध्या गतिमान करण्यात आली आहे. ३१ जुलैला अखेर प्राप्त झालेल्या यादीतील जिल्ह्यातील एकूण १० हजार ९६२ पात्र खातेदार शेतकऱ्यापैकी ८ हजार ४४४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. तर उर्वरित २ हजार ५१८ शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत १६ हजार ८३६ आणि राष्ट्रीयकृत बँकांमार्फत १ हजार २३२ अशा एकूण १८ हजार ६८ शेतकरी खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १० हजार ५२५ आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या ४३७ अशा एकूण १० हजार ९६२ पात्र खातेदार शेतकऱ्यांची पहिली यादी प्राप्त झाली आहे. ३१ जुलै २०२६ अखेर प्राप्त झालेल्या यादीतील ८ हजार ४४४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. तर उर्वरित २ हजार ५१८ शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व व्यापारी, राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा अग्रणी व्यवस्थापकांना (एलएमडी) तात्काळ सर्व खात्यांचे (उर्वरित २ हजार ५१८) आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे निर्देशही डॉ. पांचाळ यांनी दिले आहेत. आधार प्रमाणीकरणाचे काम सर्व ‘आपले सरकार’ व ‘महा-ई-सेवा’ केंद्रांवर सुरू असून या कामासाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी १५ ऑगस्टनंतर प्रसिद्ध केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करताच थकीत कर्जाची रक्कम थेट त्यांच्या खात्यावर वर्ग केली जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी पुन्हा नवीन पीककर्ज मिळणे शक्य होणार आहे. पात्र सभासदांच्या याद्या संबंधित बँक शाखा, सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या ‘आपले सरकार’ किंवा ‘महा-ई-सेवा’ केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण त्वरित पूर्ण करून घ्यावे; यासाठी कोणतेही शुल्क द्यायचे नाही. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ‘अॅग्रीस्टॅक’ नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती तात्काळ करून घ्यावी. याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच प्रमाणीकरणात अडचण आल्यास संबंधित सेवा सहकारी सोसायटीचे गटसचिव किंवा बँक निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ व जिल्हा उपनिबंधक डॉ.मांडे यांनी केले आहे.
