अनिल ठाणेकर | ठाणे
भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृती, परंपरा आणि विचारांची ओळख आहे. मातृभाषेवर प्रभुत्व मिळाल्यास व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी बनते आणि इतर भाषांचे ज्ञान आत्मसात करणेही सुलभ होते. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महानगरपालिका नेहमीच कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले. ठाणे शहरातील विविध शाळांमधील भाषा विषयात उत्कृष्ट गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी ठाणे महानगरपालिकेतर्फे कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक रमाकांत मढवी, उपायुक्त डॉ. मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेषराव बढे तसेच विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर शर्मिला पिंपळोलकर म्हणाल्या, “भाषा विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळविणे ही केवळ गुणवत्तेची नव्हे, तर जिद्द, सातत्यपूर्ण परिश्रम आणि अभ्यासावरील निष्ठेची पावती आहे. या यशामागे विद्यार्थ्यांचे समर्पण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन महत्त्वाचे आहे.” उपमहापौर कृष्णा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली असून यश मिळविताना मानसिक ताणही वाढू शकतो. त्यामुळे अभ्यासासोबत शारीरिक व मानसिक स्वास्थ्य तसेच सकारात्मक विचार यांनाही तितकेच महत्त्व द्यावे. निरोगी शरीर आणि सक्षम मन यांच्या बळावर जीवनातील मोठी उद्दिष्टे साध्य करता येतात.
सभागृह नेते हणमंत जगदाळे म्हणाले की, संस्कृत हा विषय अनेक विद्यार्थी स्कोअरिंग विषय म्हणून निवडतात. मात्र मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषा विषयांतही उत्कृष्ट गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे यश तितकेच कौतुकास्पद आहे. दहावीतील यश ही पुढील शैक्षणिक वाटचालीची सुरुवात असून बारावी, उच्च शिक्षण आणि जीवनातील प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांनी अशीच उज्ज्वल कामगिरी करावी.
सन्मानित विद्यार्थी
उर्दू विषयात ९७ गुण मिळविणारी ठामपा शाळा क्र. ८ ची विद्यार्थीनी मंतशा अंदलीब मुबीन खान हिचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्कृत विषयात १०० गुण मिळविणारे स्राग्वी समीर बर्वे, शमिका वैभव कुलकर्णी, अंजली प्रवीण साठे, अवनी रविंद्र पेंडसे, मनस्वी गुरूनाथ पाल, अवनिश गजानन पोटे, हर्षिता अविनाश कदम, सायली गोविंद प्रसाद नेरुरकर, सोहम अनिल पंजाबी (आनंदीबाई केशव जोशी इंग्रजी माध्यम शाळा), रुची नरेश जैन (श्री माँ बालनिकेतन) आणि नील महाजन (सरस्वती सेकंडरी स्कूल, ठाणे) यांचा गौरव करण्यात आला.
इंग्रजी विषयात ९६ गुण मिळविणाऱ्या अवनी रविंद्र पेंडसे (श्री माँ बालनिकेतन), जागृती जितेंद्र चौधरी, किर्ती राजू बोंडाकुटे (क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूल) आणि विराजित उत्तम फुंदे (सरस्वती सेकंडरी स्कूल) यांचा सन्मान करण्यात आला.
मराठी विषयात ९५ गुण मिळविणाऱ्या योगेश्वरी अभिजीत पोंक्षे, अनन्या अतुल वहाळकर (भगवती विद्यालय), उर्वी केदार कुलकर्णी (सरस्वती सेकंडरी स्कूल), वैदेही विकास जगदाळे आणि शिवरुद्र राम सूर्यवंशी (ज्ञानपीठ विद्यालय) यांचा गौरव करण्यात आला.
हिंदी विषयात ९४ गुण मिळविणाऱ्या श्रेया राजकुमार विश्वकर्मा (ज्ञानगंगा माध्यमिक हिंदी विद्यालय) आणि हर्षदा हरिश्चंद्र यादव (भगवती विद्यालय) यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
