दिवा : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत रविवारी सकाळी एक सुन्न करणारी घटना घडली. अवघ्या १८ वर्षीय तरुणी कामावर जाते सांगत घराबाहेर पडली होती. दिवा- कोपर दरम्यान लोकलच्या धडकेत तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. परिसरात हळहळ व्यक्त झाली, मात्र शवविच्छेदनात समोर आलेल्या माहितीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपासणीसाठी शवविच्छेदनासाठी पाठवला. लोहमार्ग पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशी तातडीने संपर्क साधून घटनेची माहिती दिली आहे. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यातील प्रभारी निरीक्षकांनी सांगितले की शवविच्छेदन दरम्यान सदर मृत तरुणी गर्भवती असल्याचे उघड झाले. इतक्या कमी वयातील ही संवेदनशील माहिती समोर आल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. तपासात तरुणी मूळची रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील असल्याचे समजले. लोहमार्ग पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशी तातडीने संपर्क साधून घटनेची माहिती दिली आहे. या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास सुरू आहे.
