उद्धव ठाकरे -आदित्य ठाकरे लवकरच कोकण दौरा करणार…!
– सुभाष देसाई चर्चा केली
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी )–धुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे लवकरच सिंधुदुर्ग सह कोकणचा दौरा करणार आहेत. पक्षातील उणीवा दूर करून संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असून लवकरच सिंधुदुर्ग पुन्हा शिवसेना माय करू असा विश्वास ‘उबाठा’ सेनेचे नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे. देसाई हे जिल्हा दौऱ्यावर आले होते. कणकवलीतील ‘विजय भवन’ येथे पक्षाचे नेते पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत देसाई यांनी संघटनात्मक बाबींवर चर्चा केली तसेच संघटनेच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर देसाई पत्रकारांशी बोलत होते. माजी आमदार व जिल्हा प्रमुख वैभव नाईक, पक्षाचे उपनेते विजय कदम, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर आदी उपस्थित होते
‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याच्या दृष्टीने आपण दौऱ्यावर आलो आहोत. सिंधुदुर्गात आल्यानंतर कार्यकर्त्यांकडून सर्वप्रथम उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा दौरा आयोजित करावा अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबईत परतल्यानंतर आपण याबाबत पक्षप्रमुखांशी चर्चा करू आणि या दोघांचा दौरा लवकरात लवकर आयोजित करण्याचा प्रयत्न करू’, असे आश्वासन देसाई यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले.
जिल्हा संघटनेत सध्या अनेक पदे रिक्त असल्याची माहिती त्यांना बैठकीत देण्यात आली. यासंबंधी बोलतांना देसाई म्हणाले,, ‘मुंबईला गेल्यानंतर यासंदर्भात आपण पक्षप्रमुखांची भेट घेऊन त्यांचे याकडे लक्ष वेधू आणि सर्व रिक्त जागा भरण्याच्या दृष्टीने कार्यवाही करू’. पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात बोलताना देसाई म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे राहुल गांधी त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. खरंतर, विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षांचे नेते काय म्हणतात हे सत्ताधाऱ्यांनी ऐकले पाहिजे विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. केवळ दडपशाही करून हे प्रश्न सुटणार नाहीत असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
अंगणवाड्यांमधील मुलांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी आल्या असून शिवसेनेचे पदाधिकारी आणि आमदार आपापल्या भागातील विशेषत: दुर्गम भागातील अंगणवाड्यांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करतील आणि दोष आढळल्यास याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात येईल. या प्रश्नावर विधिमंडळातही आवाज उठविण्यात येईल. तशा सूचना सर्व आमदार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत असेही देसाई म्हणाले. आमदार निलेश राणे यांनी जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्यावर केलेल्या टिकेबाबत नाराजी व्यक्त करून देसाई म्हणाले, या टिकेचा किती निषेध करावा तितका थोडाच आहे. विरोधकांनी एकमेकांवर टीका करावी मात्र शब्दांचा जपून वापर करावा. कमरेखाली वार केल्यास ते सहन केले जाणार नाही असा इशारा देसाई यांनी यावेळी दिला.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे सेनेचे वरिष्ठ नेते सक्रिय नव्हते याकडे लक्ष वेधले असता त्यावर स्पष्टपणे भाष्य करण्याचे देसाई यांनी टाळले. पक्षात ज्या कांही उणीवा आहेत त्या दूर करून जोमाने काम करणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आवश्यक ती कारवाई केली जाईल असे सारवासारव करणारे उत्तर देसाई यांनी यावेळी दिले.
०
