अनिल ठाणेकर
मुंबई : तरुणांचा असंतोष हा केवळ एखाद्या दिवसाच्या आंदोलनातून निर्माण झालेला नसून, बेरोजगारी, अन्याय, दडपशाही, संस्थांचा ऱ्हास आणि दीर्घकाळ साचत गेलेल्या अस्वस्थतेचा परिणाम आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या (AISA) राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनी केले. वर्षानुवर्षे मनात साचलेले मौन एका क्षणी आवाज बनून रस्त्यावर उतरते, असे सांगत त्यांनी मुंबई व दिल्लीतील अलीकडील तरुणांच्या आंदोलनांच्या संदर्भात आपली भूमिका मांडली.
नरिमन पॉईंट येथील वाय. बी. चव्हाण सभागृहात हजाराहून अधिक उपस्थितांच्या साक्षीने नेहा बोरा यांचे भाषण झाले. त्यांच्या निर्भीड आणि प्रभावी मांडणीला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाषणादरम्यान टाळ्यांचा कडकडाट तसेच घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले.
तरुणांच्या प्रश्नांवर भाष्य करताना बोरा यांनी बेरोजगारी, असुरक्षितता, अन्याय आणि भीती यांसारख्या दैनंदिन अनुभवांचा लोकशाही व राजकीय प्रश्नांशी संबंध जोडला. आजच्या तरुणाईच्या प्रश्नांना केवळ आकडेवारी किंवा राजकीय घोषणांच्या माध्यमातून समजून घेता येणार नाही, तर त्यांच्या प्रत्यक्ष जगण्यातील अनुभवांकडेही पाहणे गरजेचे आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
त्यांच्या भाषणातील वैशिष्ट्य म्हणजे तरुणांशी थेट संवाद साधणारी शैली. वस्त्या, घरे, महाविद्यालये, वसतिगृहे, रोजगाराच्या संधी, मैत्री, असुरक्षितता आणि अपमान अशा दैनंदिन अनुभवांच्या माध्यमातून त्यांनी व्यापक सामाजिक व राजकीय वास्तवाचे संदर्भ उपस्थित केले. त्यामुळे भाषणातील अनेक मुद्दे उपस्थित तरुणांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्याशी संबंधित वाटत होते.
इतिहासाकडे पाहण्याच्या दृष्टीवरही त्यांनी भाष्य केले. इतिहास हा केवळ भूतकाळात बंदिस्त विषय नसून वर्तमानातील सामाजिक आणि राजकीय प्रश्न समजून घेण्याची खिडकी आहे, असे त्यांनी सांगितले. ऐतिहासिक संदर्भांना वर्तमानातील परिस्थितीशी जोडत त्यांनी लोकशाही मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
सत्तेच्या वाढत्या प्रभावामुळे लोकशाही संस्थांसमोर निर्माण होणाऱ्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर तरुणांनी भीतीच्या पलीकडे जाऊन प्रश्न विचारण्याची गरज असल्याचे बोरा यांनी सांगितले. अन्यायाविरोधात आवाज उठवणे, सत्तेला प्रश्न विचारणे आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणे ही तरुण पिढीची जबाबदारी असल्याचा संदेश त्यांनी दिला.
भाषणादरम्यान काही वेळा सभागृहात गोंगाट वाढला. मात्र बोरा यांनी शांतपणे थांबत पुन्हा आपली मांडणी सुरू केली. त्यानंतर उपस्थितांनीही शांतता राखत त्यांचे विचार ऐकून घेतले. त्यांच्या वक्तृत्वातील निर्भीडपणा आणि तरुणांशी साधलेला थेट संवाद यामुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमानंतरही उपस्थितांमध्ये नेहा बोरा यांच्या भाषणाची आणि त्यांच्या विचार मांडणीच्या शैलीची चर्चा होती. आजच्या तरुणाईच्या प्रश्नांना वैचारिक दिशा देणारा आणि लोकशाही मूल्यांची बाजू मांडणारा तरुण आवाज म्हणून त्यांच्या भाषणाकडे पाहिले गेले.
