अंबरनाथ रायझिंगचा मोठा विजय
ठाणे : अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने साळगावकर क्रिकेट क्लबचा १०४ धावांनी दणदणीत पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित १२ व्या ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत विजयी सुरुवात केली. शुभम पुण्यार्थी आणि प्रसाद पवारच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर २० षटकांत १८६ धावांचे आव्हान उभे केल्यावर जेत्या संघाच्या गोलंदाजांनी साळगावकर क्रिकेट क्लबला २० व्या षटकात ८२ धावांवर गुंडाळत विजय निश्चित केला.
दादोजी कोंडदेव स्टेडियमवर आजपासून सुरु झालेल्या स्पर्धेतील शुभारंभी सामन्यात शुभम पुण्यार्थी आणि प्रसाद पवार अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबची तारणहार ठरले. सलामीची जोडी स्वस्तात माघारी परतल्यावर शुभम आणि प्रसादने ५५ धावांची महत्वपूर्ण भागीदारी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. शुभमने ४० चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकार ठोकत ६३ धाव बनवल्या. तर प्रसादने ३६ चेंडूतील ५४ धावांच्या खेळीत चार चौकार आणि एक षटकार मारला. किरण साळगावकर आणि ध्रुव गोठीने प्रत्येकी तीन बळी मिळवले. त्यानंतर अंबरनाथ रायझींगच्या गोलंदाजाच्या एकत्रित प्रयत्नांसमोर साळगावकर क्रिकेट क्लबचे फलंदाज ढेपाळले. परीक्षित वळसंगकर , भावेश पटेल, सौद मंसूरी आणि भाविन दर्जीने प्रत्येकी दोन फलंदाज बाद करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. शुभम पुण्यार्थीला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
संक्षिप्त धावफलक : अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब : २० षटकात ९ बाद १८६ ( शुभम पुण्यार्थी ६३, प्रसाद पवार ५४, किरण साळगावकर ३-१९-३, ध्रुव गोठी ४-४०-३) विजयी विरुद्ध साळगावकर क्रिकेट क्लब : १९.५ षटकात सर्वबाद ८२ (प्रणव टिल्लू १९, निल सावला १८, परिक्षीत वळसंगकर ४-१-५-२, भावेश पटेल ४-२१-२, सौद मंसूरी ३-२०-२, भाविन दर्जी ४-१२-२). सामनावीर – शुभम पुण्यार्थी
