भाजप मंडल अध्यक्ष राकेश चौगुले यांच्या वतीने आभार
ठाणे : शिवाईनगर, देवदयानगर येथील मुख्य चौकाला भारतमाता चौक असे नाव देण्यासाठी सुमारे १५ वर्षांपासून सुरू असलेल्या हिंदू संघटनांच्या प्रयत्नांना यश आले आहे. भाजपचे नगरसेवक सिताराम राणे यांच्या प्रयत्नाने अखेर या चौकाच्या नामकरणाचा ठराव मंजूर झाला. त्याबद्दल भाजपचे  शिवाईनगर-वसंत विहार मंडल अध्यक्ष राकेश चौगुले यांच्या वतीने सिताराम राणे यांचा, तर भाजप अनुसुचित जाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल नताशा सोनकर यांचा सत्कार करण्यात आला.
शिवाईनगर, देवदयानगर परिसरातील चौकात अनेक वर्षांपासून १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी भारतमातेच्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्याला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती असते. या चौकाचे भारतमाता चौक असे नामकरण करावे, अशी मागणी सातत्याने भाजप, हिंदूत्ववादी संघटना आणि राष्ट्रप्रेमी संघटनांकडून केली जात होती. मात्र, त्याची दखल घेतली जात नव्हती.
महापालिकेच्या निवडणुकीत या भागातून नगरसेवकपदी भाजपचे सिताराम राणे यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी याबाबत पाठपुरावा सुरू केला. या संदर्भात महापालिकेत प्रस्ताव सादर केल्यानंतर नुकत्याच झालेल्या महासभेत ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे या चौकाला लवकरच भारतमाता चौक असे नाव देण्यात येणार आहे.
या कार्याबद्दल भाजप शिवाईनगर-वसंत विहार मंडलाचे अध्यक्ष राकेश चौगुले यांनी नगरसेवक सिताराम राणे यांचा सत्कार केला. तसेच नागरिकांच्या वतीने आभार मानले.
येऊर, उपवन भागात अनेक वर्षांपासून भाजपचे संघटनात्मक आणि आदिवासी समाजासाठी कार्य करणाऱ्या नताशा सोनकर यांची नुकतीच भाजप अनुसुचित जाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीवर निवड झाली. त्याबद्दल त्यांचाही राकेश चौगुले यांनी सन्मान केला. या कार्यक्रमाला भाजप पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या वेळी भारतमातेच्या विजयाचा जयजयकार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *