अशोक गायकवाड
रायगड-अलिबाग: रायगड जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्रां’साठी इच्छुक नागरिकांनी ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे अनिवार्य आहे. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज ३० सप्टेंबर, सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. राज्यातील महा ई-सेवा, सेतू सुविधा, नागरी सुविधा व संग्राम केंद्रांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ असे एकसमान नाव व ब्रँडिंग देण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील रिक्त केंद्रांची माहिती raigad.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज करताना तांत्रिक अडचण आल्यास जिल्हा माहिती तंत्रज्ञान कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रात किमान दोन, तर पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या क्षेत्रात किमान चार केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. महानगरपालिका व नगरपरिषद क्षेत्रात दहा हजार लोकसंख्येमागे दोन केंद्रे प्रस्तावित आहेत. अर्ज मागविण्याचा कालावधी १ ते ३० सप्टेंबर २०२६ असा असून, अर्जांची छाननी १ ते १५ ऑक्टोबर आणि जिल्हास्तरीय कार्यवाही १६ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात तालुकानिहाय नव्याने सुरू होणाऱ्या केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे आहे : अलिबाग २६, कर्जत ४३, खालापूर ४५, महाड ११८, माणगाव ३४, म्हसळा ३३, मुरुड १२, पनवेल ग्रामीण २२, पनवेल शहरी ७९, पेण ४१, पोलादपूर ३५, रोहा ५३, श्रीवर्धन ३१, सुधागड २२, तळा २२ आणि उरण ३८. या संधीचा लाभ घेण्यासाठी पात्र व इच्छुक नागरिकांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करून त्याची प्रत आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालयात वेळेत जमा करावी.
