कल्याण : आगरी कोळी समाज उत्कर्ष मंडळ, कल्याण यांच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त गुरुवारी पारंपरिक उत्सव आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दुर्गाडी गणेश घाट या मार्गावर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने कोळी समाजबांधव सहभागी झाले होते.
पारंपरिक वेशभूषेतील महिला-पुरुष, ढोल-ताशांचा गजर, तिरंगा आणि उत्साही वातावरणामुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली. कोळी समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या विविध उपक्रमांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
नारळी पौर्णिमा हा कोळी समाजाच्या पारंपरिक जीवनाशी जोडलेला महत्त्वाचा सण आहे. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून सुरक्षित मासेमारीसाठी साकडे घालण्याची परंपरा आहे. त्यानुसार मिरवणुकीनंतर दुर्गाडी गणेश घाट परिसरात समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, महापौर हर्षाली थविल, शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, नगरसेवक जयवंत भोईर, माजी नगरसेवक सुनील वायले, प्रभुनाथ भोईर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. आगरी कोळी समाजाच्या परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी या उत्सवाचे आयोजन करण्यात येते.
०००००००
