आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते उद्घाटन
दिवा : कल्याण फाटा व शीळ फाटा परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून कल्याण फाटा जंक्शन (सर्कल) येथे नव्या सिग्नल यंत्रणेचे उद्घाटन कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच शहरप्रमुख व माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा उभारण्यात आली आहे.
कल्याण फाटा आणि शीळ फाटा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांसह नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. यासाठी बाबाजी पाटील तसेच नगरसेविका अर्चना पाटील यांनी संबंधित प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता.
आमदार राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, लोढा बिल्डरने पुढाकार घेत कल्याण फाटा सर्कल तसेच शीळ फाटा येथे सिग्नल यंत्रणा उभारली आहे. या कामासाठी लोढा बिल्डर आणि त्यांच्या तांत्रिक टीमचे उपस्थितांनी आभार मानले.
नवीन सिग्नल यंत्रणेमुळे कल्याण फाटा आणि शीळ फाटा परिसरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध होऊन कोंडी कमी होण्यास मदत होईल, तसेच नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सिग्नल यंत्रणा नियमित आणि सुरळीतपणे कार्यरत राहण्यासाठी संबंधित प्रशासन व वाहतूक पोलिसांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या उद्घाटनप्रसंगी आमदार राजेश मोरे, नगरसेविका अर्चना पाटील, नवी मुंबईच्या नगरसेविका सविता सांगळे, उपशहरप्रमुख चंदू आलिमकर, डायघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोल, ठाणे महानगरपालिकेचे सहायक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे, वाहतूक पोलीस विभागातील अधिकारी, संबंधित अधिकारी व अभियंते, लोढा बिल्डरची तांत्रिक टीम, शिवसेनेचे विभागप्रमुख, उपतालुका प्रमुख, तालुका पदाधिकारी, गटप्रमुख, शाखाप्रमुख तसेच खर्डी, शीळ, दिवा, दहिसर परिसरातील नागरिक व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *