कल्याण फाट्यावरील सिग्नलच्या श्रेयावरून दोन्ही पक्षांत रस्सीखेच; उद्घाटनाच्या दिवशीच वाहतूक कोंडीचा फटका
दिवा : कल्याण फाटा परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बसविण्यात आलेल्या आधुनिक वाहतूक सिग्नल यंत्रणेच्या उद्घाटनावरून बुधवारी शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. विशेष म्हणजे सकाळी शिवसेनेकडून तर संध्याकाळी भाजपकडून त्याच सिग्नल यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे ठाणे महापालिकेत दोन्ही पक्ष सत्तेत असतानाही युतीधर्माऐवजी श्रेयासाठी सुरू असलेला संघर्ष नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला.
शिक्षणमहर्षी नारायण शेठ पाटील चौक, कल्याण फाटा हा दिवा परिसरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा चौक आहे. या परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा होत असून वाहनांची वर्दळही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच शीळ फाटा आणि कल्याण फाटा परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून होणाऱ्या जीवघेण्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व प्रवाशांना तासन्तास अडकून पडावे लागत आहे.
वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी नागरिक, प्रवासी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. भाजपच्या नगरसेविका वेदिका पाटील यांनी महासभेत कल्याण फाटा येथे आधुनिक वाहतूक सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित विभागांकडेही त्यांनी पाठपुरावा केला. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच आमदार राजेश मोरे यांच्या पाठपुराव्यामुळे या सिग्नल यंत्रणेला मंजुरी मिळाल्यानंतर अखेर ती बसविण्यात आली.
मात्र, नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्यापेक्षा उद्घाटनाच्या श्रेयावरून सुरू झालेल्या राजकीय रस्सीखेचीचीच चर्चा दिवसभर रंगली. सकाळी शिवसेनेच्या वतीने उद्घाटन करण्यात आल्यानंतर संध्याकाळी भाजपच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्याच सिग्नल यंत्रणेचा पुन्हा शुभारंभ करण्यात आला.
दरम्यान, सकाळच्या उद्घाटनानंतर सिग्नल यंत्रणा सुरू होताच ती व्यवस्थित कार्यरत न राहिल्याने परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. तब्बल तीन तास लागलेली वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. कोणतीही पुरेशी ट्रायल न घेता यंत्रणा सुरू करण्यात आल्याचा आरोप काही नागरिकांकडून करण्यात आला. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
संध्याकाळी भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या उद्घाटनाच्या वेळीही वाहतूक कोंडी कायम राहिली. या कोंडीत एका रुग्णवाहिकेलाही अडकावे लागल्याने अखेर तिला विरुद्ध दिशेने मार्ग काढत रुग्णाला रुग्णालयात पोहोचवावे लागले. त्यामुळे उद्घाटनाच्या दिवशीच सिग्नल यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
“श्रेयवादापेक्षा सिग्नल यंत्रणा सुरळीत होणे महत्त्वाचे”, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत असून, राजकीय पक्षांनी श्रेयासाठी रस्सीखेच करण्याऐवजी वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यावर भर द्यावा, अशी मागणी होत आहे. नव्याने बसविण्यात आलेली सिग्नल यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित करून तिची नियमित देखभाल करण्यात यावी, तसेच वाहतूक पोलिसांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
