जेसीबीच्या सहाय्याने झाडे तोडून घुसखोरीचा आरोप; बनावट कागदपत्रांच्या आधारे हक्क सांगितल्याचा दावा
दिवा : दातिवली, ता. जि. ठाणे येथील सर्वे क्र. १४५/५ आणि १४७/५ या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप मूळ जमीन मालक चंद्रकांत मारुती किणी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. खोटे व बनावट दस्तऐवजांच्या आधारे आपल्या मालकीच्या व कब्जे-वहिवाटीतील जमिनीवर हक्क सांगण्याचा प्रयत्न होत असून, वारंवार धमकावले जात असल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
किणी कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी सुनिल गोविंद म्हात्रे, जनक म्हात्रे, लक्ष्मण म्हात्रे, राज प्रल्हाद म्हात्रे, प्रेम प्रकाश म्हात्रे, धीरज प्रकाश म्हात्रे व त्यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करून जेसीबीच्या सहाय्याने सदर जमिनीवरील झाडे तोडून बेकायदेशीरपणे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर चंद्रकांत किणी यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, संबंधित व्यक्तींना सदर जागेवर न जाण्याबाबत पोलिसांनी समज दिल्याचा दावा किणी यांनी केला आहे.
मात्र, पोलिसांच्या निर्देशानंतरही २ सप्टेंबर २०२६ रोजी पुन्हा संबंधित व्यक्तींनी जमिनीत बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. किणी यांनी त्यांना अडवून घटनेचे व्हिडिओ शूटिंग सुरू केले असता, त्यांना दमदाटी करून मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
चंद्रकांत किणी यांच्या म्हणण्यानुसार, सदर जमीन गेल्या सुमारे २५ वर्षांपासून पडीक आहे. असे असताना जमिनीवर हक्क प्रस्थापित करण्यासाठी बनावट शेतसारा पावत्या तयार करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. या पावत्यांवर अधिकृत शिक्का किंवा महसूल अधिकाऱ्याची स्वाक्षरी नसल्याचेही त्यांनी सांगितले.
या कथित बनावट पावत्यांच्या आधारे कुळ कायदा कलम ७० व अन्य तरतुदींनुसार अर्ज दाखल करून जमिनीतील अर्धा हिस्सा मागण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप किणी यांनी केला आहे. यासंदर्भात पोलिसांसह महसूल विभागाकडे लेखी तक्रारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्याने संबंधितांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, अशी भावना किणी कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. वारंवार धमक्या दिल्या जात असल्याने आपल्या जीवितासह मालमत्तेलाही धोका निर्माण झाला असून, आपल्या जमिनीचे संरक्षण करून संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी चंद्रकांत मारुती किणी यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *