CEIR पोर्टल व तांत्रिक तपासाचा प्रभावी वापर; नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक
दिवा, : मोबाईल हरवला की तो पुन्हा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे अनेक नागरिकांना वाटते. मात्र, शिळ- डायघर पोलिसांनी केलेल्या प्रभावी तांत्रिक तपासामुळे अनेक नागरिकांना त्यांचे हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाले आहेत. गेल्या दीड वर्षात पोलिसांनी तब्बल २१२ हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल फोन शोधून मूळ मालकांच्या स्वाधीन केले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कामगिरी बजावली. मोबाईलचा शोध घेताना CEIR पोर्टलसह विविध तांत्रिक तपास पद्धतींचा प्रभावी वापर करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये सुमारे १५० मोबाईल फोन, तर २०२६ मध्ये आतापर्यंत ६२ मोबाईल फोन शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. शोधण्यात आलेल्या मोबाईलमध्ये महागड्या स्मार्टफोनचाही समावेश असून, संबंधित तक्रारदारांना आवश्यक पडताळणीनंतर ते परत करण्यात आले.
मोबाईल परत मिळाल्यानंतर अनेक नागरिकांनी पोलिसांचे आभार मानत त्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले. मोबाईल हरवल्यानंतर तक्रार नोंदविणे आणि उपलब्ध तांत्रिक यंत्रणांचा वापर करून त्याचा शोध घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
हरवलेले मोबाईल शोधण्याची मोहीम पुढेही सुरू ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी मोबाईल हरवल्यास किंवा चोरीस गेल्यास तातडीने पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन शिळ-डायघर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
तसेच सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अपुऱ्या अथवा अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवता कोणत्याही घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी थेट पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *