कोकण वासीयांसाठी दिलासादायक बातमी
राजेंद्र साळसकर
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. कोकणाकडे जाणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांचे आरक्षण मोठ्या प्रमाणात फुल झाल्याने निर्माण झालेली अडचण लक्षात घेऊन ईशान्य मुंबईचे खासदार तथा केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य संजय दिना पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोडदरम्यान विशेष एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरांतील कोकणी बांधवांना गणेशोत्सवासाठी गावी जाण्यास मोठा दिलासा मिळाला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. विशेष गाड्यांचे आरक्षण फुल झाल्याने अनेक प्रवाशांसमोर गावी जाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन खासदार संजय दिना पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे अतिरिक्त रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी प्रवाशांची वाढती संख्या, आरक्षणाची उपलब्धता आणि कोकणी बांधवांची होणारी गैरसोय याबाबत सातत्याने पाठपुरावा केला.
या विशेष रेल्वे सेवेचा मुलुंड, भांडुप, कांजुरमार्ग आणि विक्रोळी परिसरातील कोकणी बांधवांना मोठा फायदा होणार आहे. या परिसरात कोकणातून मुंबईत स्थायिक झालेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. गणेशोत्सवासाठी मूळ गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.
‘गणेशोत्सव हा कोकणी बांधवांसाठी जिव्हाळ्याचा सण आहे. रेल्वेचे आरक्षण फुल झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळे केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचा सदस्य म्हणून हा प्रश्न गांभीर्याने मांडून सातत्याने पाठपुरावा केला. अखेर सीएसएमटी-सावंतवाडी रोड एक्सप्रेस सुरू झाल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे,’ असे खासदार संजय दिना पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने यंदा गणेशोत्सवासाठी २६२ विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी २०० आरक्षित विशेष गाड्यांमध्ये आतापर्यंत १ लाख १७ हजार ६८२ प्रवाशांनी आरक्षण केले आहे. या सेवा ९ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणार असून मुंबई, पुणे आणि नागपूर येथून कोकणासाठी चालविण्यात येणार आहेत. आरक्षित विशेष गाड्यांमध्ये सावंतवाडी रोडसाठी ११२, रत्नागिरीसाठी ६४ आणि मडगावसाठी २४ फेऱ्या असतील. याशिवाय ६२ अनारक्षित विशेष गाड्याही चालविण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त तिकीट खिडक्या, होल्डिंग एरिया, रांग व्यवस्थापन तसेच सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. अतिरिक्त आरपीएफ जवान आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. विशेष गाड्यांचे वेळापत्रक, मार्ग व थांब्यांची माहिती NTES अॅप तसेच भारतीय रेल्वेच्या चौकशी प्रणालीवर उपलब्ध राहणार आहे. अनारक्षित गाड्यांसाठी यूटीएस आणि RailOne अॅपद्वारे तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *