दिवा : दिवा शहरात सण उत्सवाच्या काळात उभारणाऱ्या कमानींवर पत्रकारांनी कारवाईची मागणी केली आहे. दिवा शहरातील प्रमुख रस्ते, चौक, प्रवेशद्वार, फुटपाथ तसेच सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत कमानींना प्रतिबंध करून नियमबाह्य कमानींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी दिवा शहरातील पत्रकारांच्या संयुक्त वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

गणेशोत्सव, नवरात्री तसेच दीपावली असे आनंदाचे सण व उत्सव असून ते शांततेत, सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणे आवश्यक आहे. मात्र, परवानगीशिवाय अथवा नियमांचे पालन न करता उभारण्यात येणाऱ्या कमानींमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासह पादचाऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. तसेच रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने व अन्य आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होऊ शकतो. दिवा शहरातील वाढती लोकसंख्या, अरुंद रस्ते आणि मोठ्या प्रमाणातील वाहतूक लक्षात घेता सार्वजनिक रस्ते व वाहतुकीच्या मार्गावर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी व परवानगी दिलेल्या कमानींचीही प्रत्यक्ष जागेवर तपासणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याचे आवाहन करण्यात यावे.

दरम्यान अनधिकृत कमानी उभारणाऱ्या संबंधित व्यक्ती किंवा संस्थांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करून आवश्यक असल्यास कमानी हटवाव्यात. तसेच महापालिका अतिक्रमण विभाग, जाहिरात विभाग, वाहतूक पोलीस व संबंधित अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाद्वारे संवेदनशील ठिकाणी पाहणी करावी. गणेश मंडळे व सामाजिक संस्थांना आवश्यक परवानगी घेण्याबाबत स्पष्ट सूचना देऊन सण उत्साहात साजरा करताना नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था अबाधित ठेवावी अशी मागणी दिवा शहरातील पत्रकारांच्या निवेदनातून करण्यात आली आहे.

0000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *