दापोली-पारगाव येथे मराठी भाषा संवर्धन व विकास आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
उलवे : “मराठी ही आपली मातृभाषा आणि संस्कारांची भाषा आहे. त्यामुळे आपल्या वैविध्यामुळे जगात मराठी माणूस चमकतोय. त्यामुळे तिचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी आपणा सर्वांचीच आहे. परीक्षेतील गुण महत्त्वाचेच, पण त्यापेक्षा समाजात आपली गुणवत्ता निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी कठोर मेहनत महत्त्वाची आहे. आजघडीला शासनाच्या बदलत्या धोरणांचा सर्वाधिक फटका शिक्षकांना बसतोय,” असे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे सचिव प्रा. बाळासाहेब माने म्हणाले. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, रायगड विभागाच्या वतीने मराठी विषयात विशेष गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व काव्य मैफल रविवारी रंगली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. हा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या अनंत पांडुरंग भोईर विद्यालय व रघुनाथशेठ जितेकर ज्युनिअर कॉलेज दापोली-पारगाव येथे झाला. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर तसेच दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सातारा, शाखा वाशी, नवी मुंबईचे चेअरमन प्रा. किशोर पाटील, संघटनेचे राज्य सल्लागार तथा उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या संजीवनी म्हात्रे उपस्थित होत्या.
यावेळी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती आणि मराठी भाषेचे महत्त्व पटवून देण्यात आले. वाचन संस्कृती जोपासण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांना पुस्तकांची भेट आणि महासंघाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय महासंघ रायगडच्या जिल्हाध्यक्ष प्रा. रेखा कटके यांनी कार्यक्रमामागील उद्देश व महत्त्व विशद केले. यावेळी प्रा. किशोर पाटील यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन केले. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याबरोबरच मातृभाषेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच नवीन शैक्षणिक धोरणात मराठी भाषेला असलेले महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी व समाजाने मातृभाषेच्या जतनासाठी योगदान द्यावे, असे सांगितले. प्रा. संजय पाटील यांनी दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधताना मराठी भाषेचा आग्रह धरला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
संजीवनी म्हात्रे यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध साहित्यिक उपक्रम व मराठी भाषा संमेलने आयोजित करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी ज्येठ पत्रकार कृष्णा पाटील यांनीही मराठी भाषा, संस्कृती आणि आर्थिक साक्षरता यावर आपले विचार मांडले.  महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे आयोजक प्रा. रेखा कटके यांनी नमूद केले. यावेळी श्रीवर्धन येथील कार्याध्यक्ष प्रवीण कुमार पाटील, महाडवरून प्राची हाटे, प्रा. गव्हाण, प्रा. धनंजय भोसले, प्रा. शिरसाठ, प्रा. पठाण, प्रा. वडितके, एस. एस. खिराडे व इतर अनेक शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शेळके कीर्तीदा यांनी केले, तर महासंघ जिल्हा सचिव प्राची हाटे यांनी आभार मानले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि काव्य मैफलीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *