मुंबई : राज्याचा विधि व न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतिश बबन वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांची ही नियुक्ती राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केली असून त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना २ सप्टेबर रोजी सामान्य प्रशासन विभागाच्या अवर मुख्य सचिव व्ही.राधा यांनी जारी केली.यानुसार आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी सतिश वाघोले यांना ७ सप्टेंबर रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी आयोगाचे इतर सदस्य आणि अधिकारी एमपीएससी
सतिश वाघोले यांनी एल.एल.एम.केल्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात वकिलीचा श्रीगणेशा केला.हे करीत असतानाच ते एमपीएससी उत्तीर्ण होऊन ते मंत्रालयात विधि व न्याय विभागात अवर सचिवपदी रुजू झाले.नंतर ते याच विभागात उपसचिव पुढे सहसचिव झाले.यानंतर ते २०२१ मध्ये विधि व न्याय विभागाचे व संसदीय कार्य विभागाचे सचिव झाले. ते एप्रिल २०२६ पर्यत या पदावर कार्यरत होते. राज्याच्या विधि व न्याय विभागात अत्यंत सचोटीने काम करणारे अधिकारी म्हणून मंत्रालयात सतिश वाघोले हे ओळखले जात. माहिती अधिकार कायदा,डान्सबार बंदी अधिनियम, महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) अधिनियम, या महत्वाच्या कायद्यासह सुमारे ९०० कायद्यांचे मसुदा लेखन( ड्राफ्टींग) सतीश वाघोले यांनी मंत्रालयात विविध पदे भूषविताना केलेले आहे. ग्रामीण भागातून येऊन मंत्रालयातील सचिव पद व त्यानंतर या घटनात्मक पदावर त्यांच्या झालेल्या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
००००
