शेवगा रोपाचे वृक्षारोपण
अनिल ठाणेकर
ठाणे : बालक, किशोरी, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या आरोग्य व पोषणाचा दर्जा उंचावण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने अंगणवाडी केंद्र, बांधणेपाडा येथे ९ सप्टेंबर रोजी पोषण अभियानाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. यानिमित्त पोषण दिंडी, पोषण प्रतिज्ञा, बालस्नेही गाव शपथ आणि वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पोषण दिंडीमध्ये अंगणवाडीतील बालके, माता, महिला आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संतुलित आहार, बालकांचे आरोग्य, मातांचे पोषण आणि कुपोषण निर्मूलनाबाबत जनजागृती करणारे संदेश देत ही दिंडी काढण्यात आली. यावेळी उपस्थितांनी बालकांना सकस व पौष्टिक आहार देणे, स्वच्छता व आरोग्यविषयक सवयी अंगीकारणे आणि कुपोषण निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची पोषण प्रतिज्ञा घेतली.
गावातील प्रत्येक बालकाला सुरक्षित, निरोगी आणि आनंदी वातावरण मिळावे, बालकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि गाव बालस्नेही करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, यासाठी ‘बालस्नेही गाव शपथ’ घेण्यात आली. पोषण आणि पर्यावरणाचा समन्वय साधत यावेळी शेवगा रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. शेवग्याच्या पानांमध्ये विविध पोषक घटक असल्याने पोषणाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमात मातृत्व वंदन योजना तसेच मातांच्या आरोग्याशी संबंधित विविध शासकीय योजनांची माहिती माता व महिलांना देण्यात आली. पात्र लाभार्थींनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, तसेच गर्भवती महिला व स्तनदा मातांना स्वतःच्या आरोग्यासोबत बालकाच्या आरोग्य व पोषणाकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
बालकांच्या आरोग्य, पोषण आणि पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी अंगणवाडीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये पालकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी सेविकांशी नियमित समन्वय साधावा, असेही सांगण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम अधिकारी शोभा शेलार, बाल विकास प्रकल्प अधिकारी धनश्री साळुंखे, आरोग्य अधिकारी, पर्यवेक्षिका उषा लांडगे यांच्यासह सर्व पर्यवेक्षिका, मदतनीस, प्रथम संस्थेचे समन्वयक, पालक, माता, महिला, ग्रामस्थ आणि अंगणवाडीतील बालके उपस्थित होती. पोषण अभियानाच्या शुभारंभाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा लोकसहभागातून पोषण चळवळीला मिळणारे बळ अधोरेखित करणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *