आरोग्यसेवेसाठी प्रशासन सज्ज
 गणेश मंडळांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचणार
अशोक गायकवाड
अलिबाग : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. ‘श्री गणेशा आरोग्याचा २०२६’ या महत्त्वाकांक्षी आरोग्य अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि सार्वजनिक ठिकाणी ५०० हून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, रायगड यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानात नागरिकांना विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना समन्वयक तसेच विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. आरोग्य शिबिरांचे नियोजन, आवश्यक मनुष्यबळ, वैद्यकीय सुविधा, विभागांमधील समन्वय आणि अभियानाची प्रभावी अंमलबजावणी यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. जिल्हा कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास पवार यांनी अभियानाच्या नियोजनाची माहिती दिली. अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, तसेच नागरिकांना जास्तीत जास्त आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिल्या. गणेशोत्सवाच्या गर्दीतच नागरिकांच्या आरोग्याची तपासणी आणि आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या आरोग्य शिबिरांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *