कापडी पिशवी व्हेंडिंग मशीन, सौर पथदिव्यांसह शेतकरी-व्यापारी भवनाच्या कामाला सुरुवात
कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांचे उद्घाटन तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये कापडी पिशवी व्हेंडिंग मशीनचे ५ संच, सौर ऊर्जेवर चालणारे ३० पथदिवे, शेतकरी व व्यापारी भवन तसेच मुख्य बाजार आवाराच्या प्रवेशद्वाराच्या कामाचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे, आमदार राजेश मोरे, आमदार सुलभा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अरुण पाटील, बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे, उपसभापती जालिंदर पाटील यांच्यासह बाजार समितीचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार किसन कथोरे यांनी बाजार समितीने सुरू केलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. कापडी पिशवी व्हेंडिंग मशीन बसविणे हा प्लास्टिकमुक्त बाजार समितीच्या दिशेने महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बाजार समितीच्या माध्यमातून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असून, रस्ते, वीज, पाणी, शेतकरी भवन, माथाडी भवन यांसारख्या मूलभूत सुविधांवर भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच बाजार समितीच्या स्विच लाईट स्टेशनसाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या कामालाही लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आमदार कथोरे यांनी दिली. बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळाने एकत्रितपणे काम करून शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी अधिकाधिक सुविधा निर्माण कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमास वसंत लोणे, नरेश सुरोशी, भरत गोंधळे, कपील थळे, शंकर आव्हाड, योगेश धुमाळ, रवींद्र भोईर, मनोहर पाटील, रवींद्र आव्हाड, विजय सुरोशी, गिरीश पाटील, अरुण पाटील, किशोर वाडेकर, काशिनाथ नरवडे, विद्या पाटील, शारदा पाटील यांच्यासह बाजार समितीचे पदाधिकारी, संचालक, व्यापारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
