विनोदाच्या रंगात रंगलेलं रहस्यमय नाटक!
‘पहिली लग्नाची… दुसरी प्रेमाची’
मराठी रंगभूमीला विनोदी नाटकांची समृद्ध परंपरा लाभली आहे. या प्रवाहाला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने समृद्ध करणारे दिग्दर्शक आणि कलाकार लाभले आहेत. त्यामुळे विनोदी नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षक रंगमंदिरातून मनमुराद हसून, हलक्याफुलक्या मनाने बाहेर पडतो. विनोदी नाटकाचे दोन हुकमी एक्के—दिग्दर्शक संतोष पवार आणि अभिनेते भाऊ कदम यांचं नवं कोरं नाटक ‘पहिली लग्नाची… दुसरी प्रेमाची’ सध्या रंगभूमीवर दाखल झालं आहे.
नाटकाचं नाव ऐकल्यावर प्रेम, लग्न आणि विवाहबाह्य संबंधांभोवती फिरणारी कथा असेल,असा अंदाज प्रेक्षक बांधू शकतो. मात्र, नाटकाचं शीर्षक ज्या दिशेने घेऊन जातं, त्यापेक्षा प्रत्यक्ष रंगमंचावर काहीतरी वेगळंच पाहायला मिळतं. विनोदाला रहस्याची जोड देत कथा पुढे सरकते आणि प्रेक्षकांची उत्सुकता शेवटपर्यंत कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.मोहन, त्याची पत्नी स्वाती आणि मुलगी आदिती असं हे कुटुंब. काळाच्या ओघात मोहनच्या आयुष्यात एक अनपेक्षित घटना घडते आणि त्याच्या आयुष्याला वेगळं वळण मिळतं. मात्र, आपल्या मुलीला सांभाळत तो एकटाच आयुष्याचा प्रवास सुरू ठेवतो.
वडिलांच्या आयुष्यात पुन्हा आनंद यावा,  यासाठी आदिती एक   निर्णय घेते. या निर्णया मुळे मोहनच्या आयुष्यातील भूतकाळाचा वर्तमानाशी काय संबंध आहे? आदितीचा निर्णय पुढे काय वळण घेतो?  आणि या सगळ्यामागे दडलेलं गूढ काय आहे? या प्रश्नांची उत्तरं मात्र नाटक पाहतानाच मिळतात.विशेष म्हणजे कथेत जाणवणारी एक अदृश्य उपस्थिती प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करत राहते. तिचं गूढ उलगडणं ही नाटकाची महत्त्वाची रंगत आहे. त्यामुळे कथानकाचा पुढचा भाग सांगून नाटकाची मजा घालवण्यापेक्षा हा रहस्यमय विनोदी  नाट्यप्रवास रंगमंचावर अनुभवणंच अधिक योग्य!
संतोष पवार यांनी कौटुंबिक नात्यांमधील भावनिक पदर आणि विनोदाची लय यांचा सुरेख मेळ साधला आहे. भूतकाळ आणि वर्तमान यांची सांगड घालताना प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवणं हे दिग्दर्शनाचं मोठं आव्हान असतं. हे आव्हान पवार यांनी प्रभावीपणे पेललं आहे.प्रत्येक कलाकारानं कडून उत्तम अभिनय करून घेतला आहे
भाऊ कदम म्हटलं की प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर विनोदाची एक वेगळीच शैली उभी राहते. ‘पहिली लग्नाची… दुसरी प्रेमाची’ या नाटकातही त्यांच्या अभिनयाची हीच सहजता प्रकर्षाने जाणवते. मोहन ही व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी केवळ विनोदावर भर न देता त्याच्या मनातील भावनिक कोंडी, एकटेपणा आणि नात्यांमधील गुंतागुंतही प्रभावीपणे उभी केली आहे. त्यांची संवादफेक, प्रसंगानुरूप देहबोली आणि चेहऱ्यावरचे भाव यामुळे विनोदी प्रसंग अधिक खुलतात. भाऊ कदम यांच्या अभिनयातील सहजपणा ही या प्रयोगाची मोठी जमेची बाजू आहे. त्यांच्या रंगमंचावरील उपस्थितीने प्रसंगाला वेगळीच रंगत येते आणि प्रेक्षकांशी त्यांचा सहज संवाद निर्माण होतो.मैथिली वारंग, सुजाता किरण, पूनम सरोदे परब आणि साकार देसाई यांनीही आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत. प्रत्येक कलाकाराने व्यक्तिरेखेला योग्य न्याय देत नाटकाच्या एकूण सादरीकरणाला पूरक साथ दिली आहे.
लेखक स्वप्नील बारसकर यांनी विषयाची मांडणी हलक्याफुलक्या शैलीत केली आहे. संवादांमधून विनोद निर्माण करतानाच नात्यांमधील बारकावे टिपण्याचा प्रयत्न दिसून येतो. विशेष म्हणजे विनोद आणि रहस्य यांचा समतोल राखत कथा पुढे नेण्यात लेखनाची भूमिका महत्त्वाची ठरते. नाटकाची तांत्रिक बाजूही कथेला पूरक ठरते. नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीत यांचा योग्य वापर करण्यात आला आहे. प्रसंगानुरूप वातावरणनिर्मिती होत असल्याने नाटकाच्या सादरीकरणाला उठाव मिळतो.
पहिली लग्नाची… दुसरी प्रेमाची’ हे नावापेक्षा वेगळा अनुभव देणारं, हलक्याफुलक्या विनोदातून प्रेम, लग्न आणि नात्यांकडे पाहणारं मनोरंजनप्रधान रहस्यमय नाटक आहे. गंभीर विषयाचा बोजडपणा न आणता विनोद आणि रहस्य यांची सांगड घालत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न या प्रयोगातून केला आहे.
संपदा सावंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *