नगरसेवक नारायण पवार यांच्या आक्षेपानंतर महासभेत निर्णय
ठाणे : महापालिकेतून वरिष्ठ अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर, महापालिकेच्या सचिवपदावर पुन्हा विराजमान होण्यासाठी फिल्डींग लावलेल्या बड्या अधिकाऱ्याची `महापालिका वापसी’ लांबणीवर पडली आहे. भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांच्या आक्षेपानंतर महापालिका सचिव पदावरील उमेदवाराची निवड ही महापौरांच्या दालनातील बैठकीनंतर केली जाईल. तोपर्यंत या पदावर कोणत्याही उमेदवाराची निवड करू नये, असा निर्णय आजच्या महासभेत घेण्यात आला.
ठाणे महापालिकेच्या सचिव विभागाकडील काम कार्यक्षमतेने होण्यासाठी वर्ग १ मधून निवृत्त झालेल्या अनुभवी अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी महापालिका सचिव (कराराधिष्ठित) पदासाठी जाहिरात काढण्यात आली होती. त्यासाठी ४ सप्टेंबर रोजी `वॉक इन’ मुलाखती पार पडल्या होत्या. त्या एका विशिष्ट अधिकाऱ्याला डोळ्यासमोर होत्या, असा आरोप नारायण पवार यांनी केला. या जाहिरातीला भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी आक्षेप घेतला. महापालिका अधिनियमानुसार, सचिव पदावरील अधिकाऱ्याची कराराने नियुक्ती करता येत नसल्याचा मुद्दा नारायण पवार यांनी मांडला. त्यावर महापालिका प्रशासनाच्या वतीने उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी महापालिका सचिवपदाची करार पद्धतीने नियुक्ती करता येत नसल्याचे मान्य केले. मात्र, विवक्षित म्हणजे काही विशिष्ट कामांसाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्याची नियुक्ती करता येत असल्याचे गोदेपुरे यांनी सांगितले. त्यावर महापालिका सचिव पदासाठी जाहिरात का काढली, असा सवाल नारायण पवार यांनी केला. त्यावर महापालिका प्रशासनाला ठोस उत्तर देता आले नाही. त्यानंतर सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी तूर्त महापालिका सचिव पदावर नियुक्ती करू नये. या संदर्भात महापौरांच्या दालनात बैठक झाल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले.
महापालिकेमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीत दिरंगाई होत असल्याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले. महापालिकेतील दोन अतिरिक्त आयुक्तांपैकी एक अतिरिक्त आयुक्त हा शासन सेवेतील, तर दुसरा महापालिका सेवेतील अशी तरतूद आहे. मात्र, आता दोन्ही पदांवर शासन सेवेतील अधिकारी आहेत. सहायक आयुक्तांच्या १८ पदांपैकी निम्मी पदे पालिकेतील अधिकाऱ्यांना द्यायला हवीत. मात्र, काही वर्षांपासून पदोन्नती रखडविल्या गेल्या. वेळीच पदोन्नतीची प्रक्रिया राबविली जात नसल्यामुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे, याकडे नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले.
महापालिकेकडून ९ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या तीन हात नाका ते माजिवडा नाक्यापर्यंतचा सेवा रस्ता कंत्राटदारांकडून खोदण्यात आला. तर अनेक भागात कंत्राटदारांनी रस्ते खोदल्यानंतर त्यांच्याकडून शुल्क घेतलेले नाही, याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले. या कंपन्यांना महापालिका प्रशासनाकडून अभय दिले जात आहे, असा आरोप नारायण पवार यांनी केला.
0000
