ठाणे: ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के हे शुक्रवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथून मिरवणूक निघत आहे. या मिरवणुकीमुळे तलाव पाली, राम मारुती रोड, नौपाडा क्षेत्रात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांचे यामुळे हाल होत आहेत.
ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के हे शुक्रवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास निघाले आहे. ठाणे लोकसभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची असल्याने सकाळपासूनच शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते ठाणे तलावपाली येथील मध्यवर्ती कार्यालयाबाहेर जमण्यास सुरुवात झाली होती. दाखला करण्यापूर्वी शिवसेनेच्या वतीने मिरवणूक काढली जाणार आहे. ठाणे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, बाजारपेठ, जिल्हाधिकारी कार्यालय अशी निघणार आहे.
नवी मुंबई, मिरा भाईंदर, ठाणे ठाणे या भागातून मोठ्या बस गाड्या ठाणे शहरामध्ये दाखल झाल्या आहेत. परंतु याचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर होऊ लागला आहे. या बस गाड्या गडकरी रंगायतन परिसरात उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे.
शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय हे शहराच्या महत्त्वाच्या मार्गावर असल्याने तलाव पाली राम मारुती रोड, नौपाडा, गोखले रोड टेंभीनाका या भागात वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. ठाणे शहरातील विविध भागातून सकाळी कामानिमित्त नागरिक वाहतूक करत असतात. परंतु वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांचे हाल झाले आहे. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नाही. वाहतूक बदलामुळे पोलीस आणि नागरिकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवू लागले आहेत.