जगात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या आपल्या कर्मचार्यांना चांगल्या पगारासह इतर अनेक सुविधा देतात; पण अशा अनेक कंपन्या आहेत जिथे बॉस प्रकृती अस्वास्थ्य असतानाही रजा देत नाहीत. कर्मचार्यांनाही कार्यालयात यावे लागत आहे. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा एखादा कर्मचारी गंभीर आजाराने ग्रस्त असतो आणि बॉस त्याला कामावर बोलावतो तेव्हा काय होईल? आजकाल सोशल मीडियावर एका महिलेची चर्चा आहे जिची दुखद आणि संवेदनशील कहाणी ऐकून लोक हैराण झाले आहेत.
वळीपशूवेश्रश्र९६ नावाच्या आयडी असणार्या एका महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सांगितले की, तिच्या आजारी आईचा बॉस कामावर परतण्यासाठी दबाव टाकत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिनीने म्हटले आहे, की तिची आई ५० वर्षांची आहे आणि स्टेज ४ कर्करोगाशी लढत आहे. मोठी गोष्ट म्हणजे बॉसलाही तिच्या आजाराची चांगलीच कल्पना आहे; पण तरीही तो या महिलेला ऑफिसला येण्यास सांगत असतो. मुलीने बॉसने पाठवलेल्या मेलच्या काही भागाचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. त्यावर लिहिले आहे, ‘तुम्ही कामावर परत जाण्यासाठी योग्य आहात याची पुष्टी करणारे तुमच्या ाअॅन्कोलॉजिस्टकडून पत्र मिळेल का?’ मुलीने सांगितले की, तिला विश्वास आहे की तिची आई या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर पडेल आणि पुन्हा ऑफिसला जाऊ शकेल. वडील गमावल्यानंतर ती चांगली नोकरी शोधण्यापूर्वी पदवी पूर्ण करण्याची वाट पाहत आहे. या पोस्टवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले, की ज्या कंपन्यांना कर्मचार्यांची मजबुरी देखील समजत नाही त्यांच्यासोबत काम करण्यात काही अर्थ नाही. दुसर्या यूजरने लिहिले, की मला आशा आहे की त्या लवकर बर्या होतील. अशाच एका यूजरने लिहिले, की कंपनीने यावर पुन्हा एकदा विचार करावा.
प्लेस ऑफ गॉड
या पृथ्वीतलावरची अनेक गुपितं अजूनही उलगडलेली नाहीत. बरेच शास्त्रज्ञ ही गुपितं उलगडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. असंच एक गूढ गुपित म्हणजे मेक्सिकोमधलं टियाटिहुआकन नावाचं शहर. या शहराला ‘प्लेस ऑफ गॉड’ म्हणजे देवाची जागा असंही म्हटलं जातं. या शहराची निर्मिती कशी झाली, इथे कोण रहात होतं हे कोणालाही माहीत नाही. म्हणूनच या ठिकाणाबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झाल्याचं पहायला मिळतं. टियाटिहुआकन या शहरात असंख्य पिरॅमिड्स आहेत. एजटेक्स साम्राज्यातल्या लोकांनी चौदाव्या शतकात हे शहर शोधलं. त्यांनीच या शहराला टियाटिहुआकन असं नाव दिलं. त्याआधी या स्थानाला कोणतंही नाव नव्हतं.हे शहर म्हणजे एक चमत्कारच आहे. अनेकांना हे स्थान आपोआप प्रगटझाल्याचं वाटतं. या स्थानाचे उल्लेख कुठेही आढळत नाहीत. इथे एवढे पिरॅमिड्स कोणी बांधले हेही कोणाला माहीत नाही. या शहराची लोकसंख्या २५ हजारांच्या आसपास असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या शहराचा परिसर खूप मोठा आहे. इथल्या एका पिरॅमिडच्या आत माणसांची हाडं सापडली होती. त्यामुळे हे स्थान अधिकच रहस्यमय बनून गेलं. या स्थानी माणसांचा बळी दिला जात होता, असंही काहींचं म्हणणं आहे. कितीही अंदाज वर्तवण्यात आले असले तरी या स्थानाचं गूढ अद्यापही उकललेलं नाही.
नाराज आहात? कंपनी देईल रजा
काही वेळा कर्मचारी कार्यालयात न जाण्यासाठी आजारी असल्याचे कारण पुढे करतात; पण अनेक वेळा बॉसला हे निमित्त समजते. दरम्यान, एका कंपनीने आपल्या कर्मचार्यांचे काम आणि जीवन संतुलन सुधारण्यासाठी रजेचा नवीन प्रकार शोधला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका चिनी रिटेल कंपनीचे मालक यू डोंगलाई यांनी आपल्या कर्मचार्यांना खूश ठेवण्यासाठी खास सुट्टी आणली आहे. ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या अहवालानुसार, चिनी रिटेल टायकूनने कर्मचार्यांचे काम आणि जीवन संतुलन सुधारण्यासाठी एक नवीन संकल्पना स्वीकारली आहे. याअंतर्गत फर्ममध्ये ‘नाखूश रजे’ची प्रथा सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत कर्मचार्याला कार्यालयात येण्यासारखे वाटत नसल्यास रजा घेता येईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कर्मचारी आता १० दिवसांची अतिरिक्त रजा घेऊ शकतात. तेही एखाद्याच्या इच्छेनुसार. ऑफिसला येण्यासारखे वाटत नसेल तर ते रजा घेऊन विश्रांती घेऊ शकतात. अध्यक्ष यु डोंगलाई यांनी ही माहिती दिली. या रजेबाबत अध्यक्ष यू डोंगलाई म्हणाले, की प्रत्येक कर्मचार्याला ही रजा घेण्याचे स्वातंत्र्य असावे, अशी माझी इच्छा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा ते आनंदी नसतात. आणि तुम्ही आनंदी नसाल तर कामाकडे अजिबात लक्ष देऊ शकत नका.
‘द हॅपीनेस इंडेक्स’च्या अहवालानुसार, कोणत्याही कार्यालयातील कर्मचार्यासाठी ही रजा खूप महत्त्वाची असते. या रजेच्या मदतीने कर्मचार्याला पुन्हा उत्साही वाटण्यास आणि तणावावर मात करण्यास मदत होऊ शकते. याशिवाय या रजेचा वापर कंपनीमध्ये अधिक उत्पादकता आणण्यासाठी आणि कॉर्पोरेट दबाव कमी करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. जास्त कामाच्या ओझ्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्यादेखील उद्भवू शकतात.
स्तनाच्या कर्करोगामुळे…
स्तनाचा कर्करोग हा आता कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. आता तरुणींमध्येही स्तनाचा कर्करोग दिसून येत आहे. तीस आणि चाळीशीच्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान वाढत असल्याते निर्दशनास आले आहे. अनुवांशिकता, जीवनशैली आणि पर्यावरणीय घटकदेखील यामागे कारणे असू शकतात. या आजारामुळे २०४० पर्यंत दरवर्षी एक लाखांहून महिलांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. ‘लॅन्सेट’च्या नव्या अहवालातून ही बाबसमोर आली आहे. अहवालात म्हटले, की २०२३ च्या अखेरीस सुमारे ७८ लाख महिलांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले आणि त्या वर्षी सुमारे सहा लाख ८५ हजार महिलांचा या आजाराने मृत्यू झाला. खेरीज या आजारावरील उपचारही अत्यंत महाग असल्यामुळे सर्व स्तरातील महिलांना वेळेत आणि योग्य ती मदत मिळत नाही. विशेषत: अविकसित भागांमधील वा काही विकसनशील देशांमध्येही ही स्थिती पहायला मिळते.
जागतिक स्तरावरील अंदाजानुसार स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण २०२० मध्ये २.३ दशलक्ष वरून २०४० पर्यंत तीन दशलक्षांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, ज्याचा परिणाम कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांवर होईल. २०४० पर्यंत, दरवर्षी एक दशलक्ष लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे, असा इशारा ‘लॅन्सेट’ अहवालात दिला असून स्तनाच्या कर्करोगामुळे उद्भवणारी तीव्र असमानता आणि लक्षणे, नैराश्य आणि आर्थिक भार याकडे लक्ष वेधले आहे. दरम्यान स्तनाच्या कर्करोगामध्ये अशी काही लक्षणे आहेत जी स्तनामध्ये गाठ निर्माण होण्यापूर्वी दिसतात. ‘ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर सेंटर’ने केलेल्या अभ्यासात एक हजाराहून अधिक लोकांचे सर्वेक्षण केले गेले आणि ९३ टक्के लोकांना स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण म्हणून गाठ असल्याचे आढळले. सर्वेक्षण केलेल्यांपैकी निम्म्या व्यक्तींमध्ये थकव्याव्यतिरिक्त सामान्य लक्षणे आढळून आली. स्तनाच्या कर्करोगाची सुरुवात केवळ स्तनामध्ये गाठ निर्माण होण्याने होत नाही. स्तनाग्र (निप्पल) मागच्या बाजूने दबलेली, उलटे किंवा खालच्या दिशेने वळल्यास हा धोका लक्षात घ्यावा. स्तन आकुंचन होणे, स्तनाच्या भागामध्ये संवेदना कमी होणे, स्तनाची त्वचा मंद होणे, जाड होणे, स्तनाग्रा (निपल) मधून स्त्राव होणे आदी स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. जगभरात गेल्या पाच वर्षांत स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढते आहे.
जास्त झोप हे आजाराचे लक्षण
रात्रभर झोपूनही दिवसा झोपावे वाटते. कितीही तास झोपले, तरी झोप कधीच पूर्ण होत नाही. सतत झोपणारी ही व्यक्ती आळशी आहे, असे तुम्हाला वाटते का? सत्य हे आहे की हा आळस नसून एक दुर्मीळ झोपेचा विकार आहे. ही एक गंभीर आरोग्य स्थिती आहे. मेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील २६ वर्षीय मॉडेल अॅलिसा डेव्हिस हिलाही असाच झोपेचा विकार होता. ती १२ ते १४ तास झोपायची; पण तिचा आळस काही जात नव्हता. याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेतला असता डॉक्टरांनी तिला जास्त पाणी आणि कॉफी पिण्याचा सल्ला दिला; पण तरीही झोप काही गेली नाही. सर्वांनी तिला आळशी मानले आणि ती स्वतःला ही तशीच समजू लागली. परिस्थिती अत्यंत गंभीर झाल्यावर न्यूरोलॉजी तज्ज्ञ आणि झोप तज्ज्ञ डॉक्टरांनी तिची तपासणी केली. तिच्या स्थितीचे कारण इडिओपॅथिक हायपरसोमनिया नावाचा आजार असल्याचे आढळून आले. हा एक दुर्मीळ झोपेचा विकार आहे.
हा एक दुर्मीळ झोपेचा विकार आहे. यामध्ये सतत थकवा जाणवतो आणि रात्रभर झोप झाल्यानंतर तुम्ही जेव्हा उठता तेव्हा तुम्हाला पुन्हा झोपल्यासारखे वाटते. ‘हायपरसोमनिया’ने ग्रस्त व्यक्ती इतक्या लवकर झोपी जाते की तिला त्याच क्षणी काही मिनिटे ते काही तास झोपावे लागते. या झोपेमागील कारण झोपेची कमतरता किंवा मानसिक आरोग्याची कोणतीही स्थिती नाही. साधारणपणे, पौगंडावस्थेच्या शेवटच्या वर्षांत किंवा प्रौढत्वाच्या सुरुवातीच्या वर्षांत ही समस्या उद्भवू शकते. लोक जास्त झोपेचा संबंध आळशीपणाशी जोडतात आणि आरोग्याची स्थिती म्हणून न पाहता, हे ओळखण्यासाठी कित्येक आठवडे किंवा महिने लागतात.
या आजाराने ग्रस्त लोकांची नेमकी संख्या निश्चित करणे कठीण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘नॅशनल स्लीप फाऊंडेशन’नुसार, दर दहा लाख लोकांपैकी २० ते ५० लोक या झोपेच्या विकाराने ग्रस्त आहेत. दिल्लीचे वरिष्ठ फिजिशियन डॉ. बॉबी दिवाण यांच्या मते, या झोपेचा विकार समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय शास्त्राला अजूनही खूप संशोधन करावे लागेल.
‘इडिओपॅथिक हायपरसोमनिया’चे त्याचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे दिवसा जास्त झोप येणे. ही झोप इतकी जोरदार येते की माणसाला झोप घेतल्याशिवाय राहणे जवळजवळ अशक्य होते. एखाद्या व्यक्तीने डुलकी घेतली तर ती काही मिनिटांऐवजी काही तास टिकते. बहुतेक रुग्णांची अशी तक्रार असते की, झोप घेतल्यानंतरही त्यांना ताजेतवाने वाटत नाही आणि सतत थकवा आणि आळस येतो. या स्लीप डिसऑर्डरने ग्रस्त असणारे लोक २४ तासांत १२ ते १४ तास झोपतात. ‘स्लीप फाउंडेशन’च्या मते, ‘इडिओपॅथिक हायपरसोमनिया’ने ग्रस्त असलेल्या ३५ ते ७० टक्के लोकांना स्लीप इनर्शियाचा अनुभव येतो. स्लीप इनर्शियात जागे झाल्यानंतरही व्यक्तीला चिंताग्रस्त आणि गोंधळलेले वाटते. याशिवाय या आजाराने ग्रस्त असलेल्यांना इतरही काही लक्षणे दिसू शकतात. ‘स्लीप डिसऑर्डर’मागील नेमकी कारणे अद्याप कळू शकलेली नाहीत; परंतु अभ्यासात खालीलपैकी काही कारणे समोर आली आहेत. ‘नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन’मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, ‘इडिओपॅथिक हायपरसोमनिया’ने ग्रस्त असलेल्या पन्नास टक्क्यांहून अधिक लोकांना त्यांच्या कौटुंबिक इतिहासात झोपेचा विकार किंवा तत्सम मध्यवर्ती विकार आहे. यामागे जेनेटिक्स हे सर्वात मोठे कारण असल्याचा निष्कर्षही समोर आला आहे.