मुंबई : हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाबने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे पाकिस्तानचीच भाषा बोलतायत. वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? असा सवाल करीत मतांच्या लाचारीमुळे ठाकरे गप्प बसले आहेत अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मुंबई हल्ल्यातील आरोपींना शिक्षा बजावण्यात ॲड.उज्ज्वल निकम यांनी बजावलेल्या भूमिकेचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कौतुक केले होते. मात्र वडेट्टीवार हे निकम यांच्यावर बेछूट आरोप करत असताना मतांच्या लाचारीमुळे उद्धव ठाकरे गप्प बसले आहेत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“मुंबई हल्ल्याबाबत न्यायालयात सर्व बाबी स्पष्ट झाल्या आहेत. 26 नोव्हेंबरचा दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानचा कट होता आणि अजमल कसाबच्या गोळीनेच हेमंत करकरे हुतात्मा झाले हे न्यायालयामध्ये सिद्ध होऊन पाकिस्तान तोंडघशी पडले होते. शेकडो मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या अजमल कसाब सोबत काँग्रेस असून भाजप उज्ज्वल निकम यांच्या पाठीशी आहे,” असेही फडणवीस म्हणाले.