अशोक गायकवाड
रायगड : रायगडचे पहिले शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू विजय म्हात्रे यांचे अखेर प्रदीर्घ आजारानंतर १४ मार्चला सकाळी ७-३० च्या सुमारास निधन झाले. निधना समयी ते ७१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. गेली बरीच वर्ष ते आजाराशी लढत होते. अखेर आज त्याचा शेवट झाला.
निगर्वी, निर्व्यसनी, निस्वार्थी असा त्यांचा स्वभाव होता. त्यांचे वडील नामांकित हुतूतू खेळाडू. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत विजय यांनी काळभैरव मंडळ, बोरसे संघातून कबड्डी खेळाला प्रारंभ केला. पण रायगड जिल्ह्यात त्यांना खेळाडू म्हणून नोकरी मिळाली नाही. शेवटी प्राथमिक शाळेत ते शिक्षक म्हणून भरती झाले. ते शिक्षक असल्याने “गुरुजी” या नावाने कबड्डी वर्तुळात ते प्रचलित झाले.
शेवटी आपले नशीब अजमविण्याकरीता ते मुंबईत आले. मुंबईतील अरुणोदय या विजू व मायकेल पेणकर यांच्या संघातून ते खेळले. मध्य रेल्वेत ते नोकरीस राहिले. त्यांचा खेळ पाहून महिंद्रा संघाने त्यांना आपल्या सेवेत रुजू करून घेतले. २००१ पर्यंत ते महिंद्रा संघाकडून खेळले. मुंबई जिल्हा संघाकडून ते प्रथम महाराष्ट्र संघात निवडले गेले. नंतर रायगड जिल्हा संघाकडून देखील ते बरेच वर्ष खेळले. महाराष्ट्राकडून ते ५ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत खेळले. महाराष्ट्राचे नेतृत्व देखील त्यांनी केले. १९८१ साली झालेल्या जपान, मलेशिया, थायलंड आदी आशियाई प्रसार दौऱ्यात ते भारतीय संघात होते. उत्कृष्ट डावा मध्य रक्षक असलेले गुरुजी चढाई पण उत्तम करीत. ब्लॉक करणे, एकेरी पट काढण्यात ते माहिर होते. त्यांच्या भक्कम ब्लॉक मधून सेनादलाचे सुखविंदर, हरदिप पंजाबचा बलविंदर, कर्नाटकचा भास्कर राय, सागर बांदेकर देखील सुटले नाहीत. त्यांच्या या खेळाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना १९८४-८५ चा “शिवछत्रपती पुरस्कार” जाहीर केला. पनवेल येथील कर्नाळा स्पोर्टस् स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी अनेक खेळाडूंना मार्गदर्शन करून खेळाडू घडविण्याची प्रयत्न केला. पण नंतर आजारपणामुळे इच्छा असून देखील त्यांना ते करता येत नव्हते. आज मुक्काम दिव, पोष्ट वडाव पेण येथील स्मशान भूमीत सायं. ४-०० च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुलाने अंत्यसंस्कार केले. त्यावेळी त्याचे महिंद्रातील सहकारी तारक राऊळ, सुनील जाधव, सागर बांदेकर, विलास जाधव(सर्व शिवछत्रपती पुरस्कार खेळाडू), रायगड जिल्हा कबड्डी असो. चे पदाधिकारी, खेळाडू, कार्यकर्ते, राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील महान व्यक्ती, त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.