‘बीएसएनएल’ही सरकारी दूरसंचार कंपनी सध्या संकटात आली असून आपले अस्तित्त्व टिकवण्यासाठी झगडत आहे. तसा दावा ‘बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन’ने केला आहे. या युनियनने केंद्र सरकारला थेट पत्र लिहून या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्याची विनंती केली आहे.
शासकीय दूरसंचार कंपनीच्या कर्मचार्यांच्या युनियनने चार मे रोजी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना एक पत्र लिहिले. या पत्रात युनियनने अनेक समस्यांवर भाष्य केले आहे. गेल्या काही काळात कंपनीच्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, असा दावा या युनियनने आपल्या पत्रात केला आहे. ‘बीएसएनएल’कडून हायस्पीड डेटा पुरवला जात नाही. याच कारणामुळे ग्राहक दुसर्या कंपनीचा डेटा वापरत आहेत, असा दावा या पत्रात करण्यात आला आहे.
‘बीएसएनल’च्या ग्राहकांची संख्या कमी होण्यासाठी ‘टीसीएस’ कारणीभूत असल्याचा दावा कर्मचार्यांच्या युनियनने केला आहे. बीएसएनएल ४ जी सेवा देण्यावर काम करत आहे. सध्याच्या स्पर्धायुगात कंपनीला टिकून रहायचे असेल तर ‘हायस्पीड डेटा सर्व्हिस’वर काम करणे गरजेचे आहे. जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया यासारख्या कंपन्या सध्या ग्राहकांना हायस्पीड फाईव्ह जी डेटा देत आहेत. ‘बीएसएनएल’कडे मात्र अजूनही चार जी सेवाच देत आहे. याच कारणामुळे ग्राहक ‘बीएसएनएल’ सोडून अन्य कंपन्यांचे इंटरनेट वापरत आहेत.
‘बीएसएनएल एम्प्लॉइज युनियन’च्या म्हणण्यानुसार ‘बीएसएनएल’च्या फोर जी सेवांना टीसीएसमुळे उशीर होत आहे. फोर जी सेवा पुरवण्यासाठी लागणारी उपकरणे पुरवण्यासाठी ‘टीसीएस’ला ऑर्डर देण्यात आली आहे; मात्र ही उपकरणे देण्यासाठी ‘टीसीएस’कडून उशीर होत आहे. युनियनच्या म्हणण्यानुसार टीसीएस कंपनीने फोर जी उपकरणांचे फील्ड ट्रायलदेखील पूर्ण केलेले नाही.
युनियनने केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात ‘बीएसएनल’चे ग्राहक कमी झाल्याचा दावा केला. गेल्या वित्तीय वर्षात ‘बीएसएनएल’चे साधारण १.८ कोटी ग्राहर कमी झाले आहेत. यातील २३ लाख ग्राहक हे एकट्या मार्च महिन्यात कमी झाले आहेत. यावरून बीएसएनएल ही कंपनी सध्या संकटात सापडली असून तिची स्थिती गंभीर आहे, असा दावा केला जातो.