किन्हवली : शहापूर तालुक्यात सोमवारी (ता. १३) दुपारी वादळी वारा व मेघगर्जनेसह अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लग्नाचे मंडप कोसळून पडले. गेल्या अनेक दिवसांपासून शहापूर तालुक्यातील तापमानाचा पारा ४१ ते ४२ अंशांपर्यंत चढलेला होता. उष्णतेमुळे अंगाची लाही लाही झाली होती. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या शिडकाव्यामुळे दिलासा मिळाला असला तरी थंडोळखांब, कसारा, शेणवा, किन्हवली, टाकीपठार, सोगाव, वाशिंद आदी परिसरातील ग्रामीण भागात विविध प्रकारचे नुकसान झाले आहे.

दुपारी वादळी वारा व मेघगर्जनेसह अचानक आलेल्या पावसामुळे तालुक्यातील नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी लग्न व हळदी समारंभासाठी सजावट केलेल्या नक्षीदार व आकर्षक मंडपाच्या कापडातून पाण्याच्या धारा ओघळत होत्या. मंडपात चिखल-माती झाली होती. पाहुण्यांसाठी केलेला स्वयंपाक व सोयी-सुविधा वाया गेल्याने यजमानांचे नुकसान झाले. सजावटीचे महागडे कापड, विद्युत व्यवस्था पावसात भिजून मंडप डेकोरेशनवाल्यांचेही अतोनात नुकसान झाले. तसेच पाऊस लांबलाच तर गुरांच्या वैरणीची व्यवस्था करून ठेवलेला पेंढा भिजून गेला.

मंडप डेकोरेटर्सना दरवर्षी अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे अतोनात नुकसान तर होतेच; परंतु प्रशासनही आमच्या नुकसानीची कधीच दखल घेत नाही. त्यामुळे व्यवसाय करणे मुश्कील झाले आहे.

– चंद्रकांत देसले, मंडप डेकोरेटर्स, डोळखांब

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *