नवी मुंबई : खरीप हंगामात शेतक-यांना बियाणे, खते व किटकनाशके आदींबाबत उदभवणा-या अडचणींचे निराकरण व्हावे, तसेच काळाबाजार व साठेबाजीला आळा बसण्याच्या उद्देशाने कृषि विभागामार्फत विभाग व प्रत्येक जिल्हास्तरावर निविष्ठा तक्रार निवारण कक्ष सुरु झाला आहे. अशी माहिती ठाण्याचे कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी दिली. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे बियाणे, खते, किटकनाशके व इतर बाबींसंदर्भात काळाबाजार दिसताच थेट नियंत्रण कक्षात तक्रार देता येणार आहे.
चालू खरीप हंगामाला काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. बियाणे खरेदी करण्यासाठी शेतक-यांची लगबग सुरु झाली आहे. अशावेळी शेतक-यांना खरीप हंगामावेळी येणा-या अडचणींबाबत तक्रारी करता याव्यात, यासाठी विभागास्तरावर तसेच जिल्हास्तरावर निविष्ठा तक्रार निवारण कक्ष स्थापन करणेत आले आहेत. सदर नियंत्रण कक्षामध्ये कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच तक्रार निवारण कक्षाचा भ्रमणध्वनी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तक्रार नोंदविल्यानंतर लगेच शेतक-यांच्या समस्येचे निराकरण केले जाणार आहे. कृषि निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिकींगबाबत असलेल्या तक्रारींचे निवारण केले जाईल. शेतक-यांना कृषि निविष्ठांबाबत काही तक्रार असल्यास पुढे दिलेल्या निविष्ठा तक्रार निवारण कक्षांशी भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेलद्वारे संपर्क साधून तत्काळ तक्रार नोंदविण्यात यावी. जिल्हा संपर्क विभागीय कार्यालय, ठाणे ८६९१०५८०९४, toqethanediv@gmail.com, ठाणे ७०३९९४४६८९. dsaothane.2021@gmail.com, पालघर ९४२३९८४४४३, dsaopalghar@rediffmail.com, रायगड ९५०३९७५९३४, dsaoraigad@gmail.com, रत्नागिरी ८६६८५७२५२८ dsaortn@rediffmail.com, सिंधुदुर्ग ९४२३९२२३४६, saosindhu@gmail.com या तक्रार नियत्रंण कक्षाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ठाण्याचे कोकण विभागीय कृषि सह संचालक अंकुश माने यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
