मुंबई : राज्यात आज अवकाळी पावसाने धूमाकुळ घातला. अवकाळी पावसाने उन्हाच्या तडाख्यापासून सूटका झाली असली, तरी उन्हाळी पिके आणि आंब्याला मोठा फटका बसला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, छत्रपती संभाजीनगर, लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
रायगड मधील माणगाव तालुक्यातील लोणेरे परीसरात गारांचा पाऊस कोसळला. जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. खामगाव, शेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. महाड,माणगाव, पोलादपूर, म्हसळा श्रीवर्धन भागात अवकाळी पाऊस झाला. दुपारी तीनपर्यंत कडक उन्हाचे चटके बसत असताना अचानक रायगडच्या या भागात वादळी वाऱ्यासह ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि अचानक अवकाळी पाऊस कोसळू लागला.
रायगडमधील कर्जत खोपोली, खालापूर तालुक्यांत देखील पाऊस कोसळला. या परिसरातील विट भट्टी व्यवसायिक मात्र संकटात सापडले आहेत. नुकत्याच विटांचा थरांचा ढीग जाळण्यासाठी रचण्यात आला होता. मात्र, अवकाळीने या व्यवसायिकांवर मोठं संकट निर्माण केलं आहे.
