मुंबई : अवघा देश लोकसभेच्या निवडणूकीत दंग असताना या देशाला जगवणारा शेतकऱ्याचे दुख: संपता संपत नाहीय. दुख:च्या ओझ्याखाली हा शेतकरीच संपत चालल्याची विदारक आकडेवारी समोर आलीय. महाराष्ट्रातील एकट्या मराठवाडा विभागात आठ जिल्ह्यातील २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची भीषण अवस्था समोर आली आहे. मराठवाडा विभागात सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत.
मराठवाड्यात गेल्या चार महिन्यात २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आहेत. बीडमध्ये ५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजी नगरचा नंबर असून ४४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांची वाताहत सुरु असल्याचे चित्र आहे.
गेल्या चार महिन्यात झालेल्या आत्महत्या
- जालना २९
- परभणी १२
- हिंगोली १३
- नांदेड ४१
- बीड ५९
- लातूर २७
- धाराशिव ४२
- एकूण २६७
गेल्या चार महिन्यांत २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असतानाच २०२३ मध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये तब्बल १०८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालातून समोर आले होते. २०२२ च्या तुलनेत हा आकडा ६५ ने वाढला होता.
२०२३ मध्ये झालेल्या १०८८ आत्महत्यांपैकी बीडमध्येच सर्वाधिक २६९ आत्महत्या झाल्या होत्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये १८२, नांदेडमध्ये १७५, धाराशिवमध्ये १७१ आणि परभणीमध्ये १०३ आत्महत्या झाल्या, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. जालना, लातूर आणि हिंगोली येथे अनुक्रमे ७४, ७२ आणि ४२ मृत्यूची नोंद झाली आहे. मराठवाड्यात २०२२ मध्ये सुद्धा १०२३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांचा समावेश आहे.
