यंत्रणा मात्र संथ; दुपारनंतर मतदानाचा ओघ वाढला
मोखाडा : पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मोखाड्यात मतदारांनी सकाळ पासूनच मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला आहे. मात्र, मतदान करताना, मतदान यंत्र संथ गतीने चालत असल्याने, मतदानासाठी ऊशीर होत असल्याच्या तक्रारी मतदारांकडून येत होत्या. तर दुपारनंतर मतदानाचा ओघ वाढला आहे.
विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील मोखाडा तालुक्यात एकुण 77 मतदान केंद्र आहेत. तर 59 हजार 358 मतदार आहेत. सकाळपासून तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदारांनी, मतदानासाठी गर्दी केली होती. मात्र, यंत्रणा संथ गतीने काम करत असल्याने, एका मतदानासाठी 5 ते 10 मिनिटे लागत असल्याच्या तक्रारी आमदारांकडून आल्या आहेत. त्यामुळे मतदारांना केंद्राबाहेर वाट पहावी लागत होती. विशेषतः महिला व वृध्द मतदारांनी वाट पाहून घरची वाट धरली.
दुपारनंतर ऊन्हाची तिव्रता कमी झाल्याने, मतदार पुन्हा मतदानासाठी बाहेर पडले. त्यामुळे सर्वच मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाल्याची दिसून आली आहे. तालुक्यातील वाशिंद – दुधगाव मतदान केंद्रावर मतदानाच्या आकडेवारीत फरक आढळून आल्याने, मतदान अर्धा ते एक तास बंद करण्यात आल्याची माहिती मतदान केंद्राध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी दिली आहे. मात्र, त्यानंतर मतदान सुरळीत सुरु झाल्याचे ठोंबरे यांनी सांगितले आहे. तर एका मतदानासाठी 10 मिनिटे लागत असल्याने, मतदारांमध्ये नाराजी असल्याचे संजय मांगे या मतदाराने सांगितले.
