पाळणाघरात मुलांना उलटे टांगून माराहणीची शिक्षा
डोंबिवली – डोंबिवलीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील फडके रोडवरील लहान मुलांचा सांभाळ करणाऱ्या हॅप्पी किड्स डे केअर सेंटरमध्ये केंद्र चालकाकडूनच लहान मुलांना शिक्षा म्हणून उलेट बांधून शिक्षा केल्याचा अमानुष प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत मुलांचा छळ होत असल्याचा एक व्हिडीयो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या डोंबिवली जिल्हा संघटक कविता गावंडे यांच्या तक्रारीवरून हे केंद्र चालवणाऱ्या मालक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पाळणाघर चालवणाऱ्या गणेश प्रभुणे, आरती प्रभुणे या दाम्पत्यासह राधा नाखरे या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवली पूर्वेत राहणारे मंदार उगले आणि त्यांची पत्नी हे दोघे नोकरदार आहेत. त्यांची तीन वर्षांची मुलगी ते डोंबिवली पूर्वेकडील फडके रोडला लक्ष्मी सागर सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या हॅपी किड्स डे केअर या पाळणाघरात ठेवतात. हे पाळणाघर प्रभुणे दाम्पत्य चालवते. मुलीला सांभाळण्यासाठी पाळणाघराच्या चालकाला उगले दाम्पत्य दर महिन्याला साडेआठ हजार रुपये शुल्क देतात. गणेशसह त्यांची पत्नी आरती प्रभुणे, राधा नाखरे हे पाळणाघरात लहान मुलांचा सांभाळ करतात.
उगले यांच्या मुलीसह अनेक लहान मुले या पाळणाघरात सांभाळण्यासाठी आहेत. प्रभुणे दाम्पत्य आणि राधा नाखरे यांच्याकडून लहान मुलांना बांधून ठेवले जात होते. प्रसंगी शिक्षा म्हणून उलटे टांगून त्यांना मारहाण केली जात असे. मुलांना या पाळणाघरात शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता, अशा पालकांच्या तक्रारी वाढल्या होत्या.
या पाळणाघरात साधना सामंत काम करण्यास रुजू झाल्या. त्यांनी बालकांना केंद्र चालकांकडून होत असलेल्या छळवणुकीचा धक्कादायक प्रकार पाहिला. सुरुवातीला त्यांनी या प्रकाराला विरोध केला. मात्र प्रभुणे दाम्पत्य काही ऐकत नव्हते. अखेर साधना सामंत यांनी हा प्रकार त्यांच्याकडील मोबाईल कॅमेरात कैद केला. ही दृश्य चित्रफित त्यांनी ठाकरे गटाच्या डोंबिवली जिल्हा संघटक कविता गावंड यांना दाखवली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कविता गावंड यांनी संबंधित पालकांना फोन करून सगळ्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी जिल्हा संघटक गावंड यांच्यासह रामनगर पोलीस ठाणे गाठून आपल्या मुलीला देण्यात येणाऱ्या अमानुष वागणुकीची माहिती रामनगर पोलिसांना दिली.
सुरुवातीला पोलिसांनी तुम्ही चाईल्ड वेल्फेअरमध्ये जा, असा सल्ला देऊन तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. मात्र या गंभीर घटनेची माहिती डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांना मिळताच त्यांनी तत्काळ फिर्याद दाखल करून घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात गणेश आणि आरती प्रभुणे या दाम्पत्यासह राधा नाखरे या नोकरदार महिलेविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.