मुंबई : मध्य रेल्वेवरून येत्या १ आणि २ जूनला प्रवास करीत असाल तर रेल्वेचा प्रवास टाळा . कारण १ आणि २ जून रोजी मध्य रेल्वेकडून ३६ तासांचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या दोन दिवशी तब्बल ६०० लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या नूतनीकरणासाठी मध्य रेल्वेकडून हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावरील लोकल रद्द करण्यात येण्याची शक्यता आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २४ डब्यांच्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म १० आणि ११ च्या विस्तार करण्याचं काम सुरु आहे. या विस्तार आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे विशेष ब्लॉक चालवण्यात येणार आहे.

सीएसएमटी स्थानकातून उपनगरीय लोकल आणि लांब पल्याच्या मेल एक्स्प्रेस गाड्या चालवल्या जातात. सीएसएमटी स्थानकातील मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे मध्य रेल्वेने हाती घेतलं आहे. प्लॅटफॉर्म १० ते १४ चा विस्तार २४ डब्यांच्या गाड्या चालविण्यासाठी करण्यात येणार आहे. हे काम आता शेवटच्या टप्प्यात आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य लाईन आणि हार्बर मार्गावर दररोज 1 हजार 810 लोकल चालविण्यात येतात. त्यापैकी 1 हजार 299 हून अधिक लोकल सीएसएमटी स्थानकातून ये-जा करतात.

प्रवासी क्षमता 20 टक्क्यांनी वाढणार

मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे डब्बे वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे सीएसएमटी स्थानकावरील मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार सुमारे ३०५ ते ३८२ मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. यामुळे प्रवासी वहन क्षमता वीस टक्क्यांनी वाढणार आहे. तसेच यार्ड रिमॉडेलिंग आणि अत्यावश्यक सेवा इमारतींच्या बांधकामासोबत प्रकल्पामध्ये ६१ जुने ओव्हर हेड इक्विपमेंट मास्ट्स, ७१ सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन अडथळे काढण्यात येणार आहेत. यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

दरम्यान, या कामासाठी आधीच मध्य रेल्वेने 17 मेपासून विशेष रात्रकालीन ब्लॉक सुरु केला असून हा ब्लॉत 2 जून पर्यंत कायम राहणार आहे.

शनिवार, 1 जून रोजी मध्यरात्रीनंतर ब्लॉक सुरू होण्याची शक्यता आहे. या ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरील वडाळा ते ते सीएसएमटी आणि मुख्य मार्गावर भायखळा ते सीएसएमटी लोकल सेवा बंद ठेवण्याचा विचार सुरु आहे. तसेच 100 लांब पल्ल्यांच्या गाड्यांपैकी सुमारे 60 टक्के गाड्यांवरही ब्लॉकमुळे परिणाम होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *