सातारा: केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांच्या गाडीचा गुरुवारी साताऱ्यात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, साताऱ्यातील वाई परिसरात हा अपघात घडला. रामदास आठवले हे आपल्या कारने साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येत होते. यावेळी वाई परिसरात त्यांची कार एका कंटेनरला जाऊन धडकली. या धडकेत कारच्या बोनेटचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. परंतु,सुदैवाने या अपघातामध्ये रामदास आठवले यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. या अपघातानंतर रामदास आठवले दुसऱ्या वाहनाने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
या अपघातानंतर रामदास आठवले यांनी फोनवरुन ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, मी काल महाडला होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनासाठी मी महाडमध्ये होतो. रात्री ९ वाजेपर्यंत मी महाडमध्ये होतो.त्यानंतर मी महाबळेश्वरमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी गेलो. त्याठिकाणी माझा मुक्काम होता. त्यानंतर मी वाईमध्ये आलो. वाईमधून मुंबईला निघालो तेव्हा सव्वा सहा वाजता खंडाळा बोगद्यात एका गाडीचा पंक्चर काढत होते, त्यावेळी दोन कंटेनर तिकडे येऊन थांबले. तेव्हा आमची पोलिसांची गाडी कंटेनरला ठोकली. आमच्या ड्रायव्हरने ब्रेक दाबला पण आमची गाडी ठोकली. यामध्ये आमच्या गाडीच्या इंजिनाचे नुकसान झाले. माझ्याबरोबर माझी पत्नी सीमा आणि तिची आई होती. मात्र, आम्ही सगळे सुखरुप आहोत, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
०००००००००००००००००००