कल्याण : कल्याण शहरातील वाहन कोंडीची समस्या सुटता सुटत नसल्याने प्रवासी हैराण आहेत. दररोज सकाळी आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत कल्याण पूर्व, पश्चिमेतील बहुतांशी रस्ते वाहन कोंडीत अडकत असल्याने यामध्ये कामावरून परतणाऱ्या नोकरदारांचे सर्वाधिक हाल होत आहेत. या कोंडीतून सुटण्यासाठी एक ते दीड तास लागत आहे. कल्याण शहरातील अरूंद रस्ते, दामदुपटीने वाढलेली वाहने आणि वाहनतळांच्या सुविधा नसल्याने रस्तोरस्ती दुतर्फा उभी करून ठेवण्यात आलेली मोटारी, टेम्पोसारखी वाहने या कोंडीत सर्वाधिक भर घालत आहेत.
कल्याण रेल्वे स्थानक भागात तर मागील पाच वर्षापासून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उड्डाण पूल उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे हा भाग सतत कोंडीत असतो. कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक, महमद अली चौक, गुरुदेव हॉटेल चौक, संतोषी माता रस्ता, सहजानंद चौक भागातून वाहनांची सर्वाधिक वर्दळ असते. कल्याण पश्चिमेतील पूर्व भागात जाण्यासाठी बहुतांशी मोटार चालक, अवजड वाहन चालक रामबागेतील गल्ल्यांचा वापर करतात. ही वाहने या गल्ल्यांमधून मुरबाड रस्त्यावर येऊन बाईच्या पुतळ्याकडे वळण घेत असताना कल्याण रेल्वे स्थानकाकडून येणारी आणि स्थानकाकडे जाणारी वाहने या कोंडीत अडकतात. याठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने दुचाकी स्वार या कोंडीत आणखी भर घालतात.
कल्याण वाहतूक विभागाच्या हाताबाहेर परिस्थिती जाण्यापूर्वी ही कोंडी आटोक्यात आणण्याची मागणी होत आहे. कल्याण पश्चिमेतील वाहतूक कोंडीत अडकायला नको म्हणून अनेक वाहन चालक कल्याण पूर्व भागातून एफ केबिन पुलावरून कल्याण पश्चिमेत येतात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडत आहे.
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील बस थांबे बंद करण्यात आल्याने हे थांबे गोविंद करसन चौकात सुरू करण्यात आले आहेत. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील या बसमुळे कोंडी होते. दुर्गाडी पूल, आधारवाडी भागातून येणारी वाहने सहजानंद चौक येथून संतोषी माता रस्त्याने रामबागेतून मुरबाड रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतात. ही वाहने कल्याण शहरात सर्वाधिक कोंडी करत आहेत.
कल्याण शहरात मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर टोलेजंग इमारती उभारण्यास पालिकेच्या नगररचना विभागाने परवानग्या दिल्या आहेत. अनेक इमारतींच्या तळ मजल्याची वाहनतळे पालिका नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी अधिमूल्य भरणा करून तेथे सदनिका उभारणीस किंवा तेथील वाहनतळ रद्द करून देण्यास विकासकांना मोलाची मदत केल्याने या नवीन इमारतींमधील सर्व वाहने रहिवासी रस्त्यावर उभी करतात.
पालिका आयुक्तांसह नियत्रक अधिकाऱ्यांचे शहरावर नियंत्रण राहिले नसल्याने पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील रस्ते जागोजागी खोदून ठेवण्यात आले आहेत. पत्रीपुलाजवळ नेहमीप्रमाणे कोंडीला सुरूवात झाली आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाविषयी पालिकेसह वाहतूक विभागाला सजगता नसल्याने नागरिक संतप्त आहेत. अगोदर उन्हाचे चटके, त्यात कोंडीचा त्रास अशा दुहेरी कोंडीत सध्या कल्याणमधील नागरिक अडकले आहेत. पावसाळ्यापूर्वीचे सामान घर खरेदीसाठी कल्याण शहरा जवळील मुरबाड, शहापूर भागातील नागरिक अधिक संख्येने वाहने घेऊन शहरात येत आहेत. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडत आहे.