ठाणे : शासकीय संस्थांसह शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या होणाऱ्या विक्रीमुळे विद्यार्थ्यांना त्याचे व्यसन जडण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने सलाम फाऊंडेशन, मुंबई यांच्या सहकार्यातून ‘तंबाखूमुक्त शाळा’ हा उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमातून ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील ९६३ शाळा तर, १६८ आरोग्य संस्था तंबाखूमुक्त झाल्या आहेत. तर, दुसरीकडे कोपटा कायद्यानुसार २०५ जणांवर दंडात्मक कारवाई करीत ४१ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर समोर आली आहे.
भारतासारख्या विकसनशील देशातील तरुणाईला तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाने ग्रासले आहे. अशातच ज्या ठिकाणी देशाची भावी पिढी संस्कारक्षम व्हावी, धूम्रपान, मद्यपान या अनिष्ट व्यसन प्रवृत्तीपासून ती दूर राहावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार शाळा व शाळा परिसर हा तंबाखूमुक्त असावा, यासाठी तंबाखूमुक्त शाळा या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेच्या आवारात जनजागृतीचे तीन फलक लावण्यात आले आहेत.
तसेच ज्या शाळा तंबाखूमुक्तीचे ११ निकष पूर्ण करतील, अशा शाळांना तंबाखूमुक्त म्हणून घोषित केले जाते. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील शहरी भागातील शाळांसह ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची सलाम मुंबई फाऊंडेशनच्या ॲपवर नोंद करण्यात येत असते. नोंदणी झालेल्या शाळांपैकी ज्या शाळांनी तंबाखूमुक्तीचे ११ निकष पूर्ण केले, अशा ९६३ शाळा तंबाखूमुक्त म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर, दुसरीकडे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, नगर परिषद अशा १६६ शासकीय संस्थादेखील तंबाखूमुक्त झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
ठाणे जिल्ह्यात सलाम मुंबई फाऊंडेशन आणि जिल्हा तंबाखू नियंत्रण विभागाच्या माध्यमातून तंबाखू सेवनापासून प्रवृत्त करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. तर, तंबाखूमुक्ती केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत १२ हजार १३९ तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्याचे समुपदेशन केले. या समुपदेशनाची फलश्रुती म्हणजे १४९ जण तंबाखूमुक्त झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
२०५ जणांवर दंडात्मक कारवाई
ठाणे जिल्ह्यातील शासकीय संस्था, आरोग्य विभाग आणि रस्त्यावर तंबाखूचे सेवन करून थुंकणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील वर्षी एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत तंबाखूचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालयाच्या आवारात थुंकणाऱ्या ८७० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात एक लाख ६३ हजार ९१० रुपयांचा दंड वसूल केला. तर, यंदा एप्रिलमध्ये २०५ जणांवर कारवाई करीत ४१ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.